मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी थोड्याच वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली आहे. सोमवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे म्हणाले कि, “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून…अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.” काही वेळात नारायण राणे यांचे हे विधान प्रचंड चर्चेत आलं आणि त्यांच्या अडचणीचं कारण देखील ठरलं. शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. राज्यभर या प्रकरणाचे अत्यंत तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, या अटकेमुळे नारायण राणे हे गेल्या २० वर्षांत राज्य पोलिसांनी अटक केलेले पहिले केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि तिसरे केंद्रीय मंत्री ठरले आहेत.
‘ते’ पहिले दोन केंद्रीय मंत्री कोण?
राज्य पोलिसांकडून अटक झालेले पहिले २ तत्कालीन केंद्रीय मंत्री म्हणजे दिवंगत मुरासोली मारन आणि टी.आर.बालू. ज्यांना चेन्नई पोलिसांनी जून २००१ मध्ये मध्यरात्री अगदी नाट्यमय घडामोडीनंतर अटक केलं होतं. यावेळी चेन्नई पोलिसांनी मारिन आणि बालू यांच्यासह तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना देखील अटक केली होती. १२ कोटी रुपयांच्या ‘फ्लायओव्हर घोटाळ्या’शी संबंधित हे प्रकरण होतं. त्यानंतर त्यांना १० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी, तत्कालीन केंद्रीय उद्योग मंत्री मारन हे अटकेदरम्यान पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीत जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. टीआर बालू यांना देखील किरकोळ दुखापत झाली होती. मारन हे करुणानिधी यांचे पुतणे होते.
दुसऱ्या दिवशी जामिनावर सुटका
सन टीव्हीने प्रसारित केलेल्या अटकेच्या फुटेजमध्ये करुणानिधी, मारन आणि बाळू यांच्याशी पोलिसांची झालेली बाचाबाची दिसून येत होती. मारन आणि बाळू दोघांनी पोलिसांना करुणानिधींना अटक करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न देखील केला होता. यावेळी पोलिसांना रोखण्यासाठी त्यांच्या गाडयांना दुर्घटना ग्रस्त केलं होतं, असं म्हटलं जातं. दुसऱ्या दिवशी तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस चेन्नईला गेले आणि त्यानंतर या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांची जामिनावर सुटका झाली होती. तर आता या दोन केंद्रीय मंत्र्यानंतर राज्य पोलिसांकडून अटक झालेले नारायण राणे हे तिसरे केंद्रीय मंत्री ठरले आहेत.
अटकेनंतर राणेंची पहिली प्रतिक्रिया
अटक झाल्यानंतर टाइम्स नाऊ या खाजगी वृत्तवाहिनीला व्हि़डीओ कॉलच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले कि, “उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन. ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत. अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजकारणामध्ये आहोत,” असं सूचक वक्तव्य नारायण राणेंनी केलं. यावेळी देखील नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला.