Narayana Murthy Comments On AI In India: इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतातील प्रत्येक गोष्टीचे श्रेय आर्टिफिशियल इंटेलिजेंसला (AI) देण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली आहे. टायइकॉन मुंबई २०२५ शिखर परिषदेत बोलताना ते म्हणाले, “भारतात प्रत्येक गोष्टीसाठी एआय चा उल्लेख करणं ही एक फॅशन झाली असल्याचे मला वाटते. मी अनेक साध्या कार्यक्रमांना एआय प्रोत्साहित कार्यक्रम म्हटल्याचे पाहिले आहे.” नारायण मूर्ती यांना असे वाटते की, एआय बद्दल बरेच गैरसमज आहेत आणि ते समजून घेणे आवश्यक आहे.
खरे एआय मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग
एआय बाबत बोलताना नारायण मूर्ती यांनी सांगितले की, “खरे एआय मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगवर आधारित आहे. एआयमध्ये दोन मूलभूत तत्त्वे आहेत. मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग, मशीन लर्निंगमुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात डेटाच्या आधारे काम करण्यास मदत होते. तर डीप लर्निंग मानवी विचारांचे अनुकरण करू शकते आणि नवीन परिस्थिती स्वतःहून समजून घेऊ शकते. ते मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीची नक्कल करते.”
इन्फोसिसमधील एआय
नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, “इन्फोसिस देखील एआय वर काम करत आहे, परंतु त्यांचे लक्ष स्मॉल लँग्वेज भाषा मॉडेल्सवर आहे, जे विशिष्ट उद्योगांसाठी उपयुक्त ठरतील.”
मूर्तींचे असे म्हणणे आहे की, “जुन्या प्रोग्राम्सना नवीन नावे खरे एआय नाही. खरे एआय ते आहे जे जटिल समस्या सोडवू शकतो. मी ज्यांना एआय म्हणतो ते मूर्ख आणि जुने प्रोग्रॅम्स आहेत. इन्फोसिस एआय तंत्रज्ञान सुधारण्यासाठी ओपन-सोर्स आणि स्वतःचा डेटा वापरत आहे.”
कर्मचाऱ्यांना माणसांसारखं वागवलं पाहिजे
कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ७० तास काम करावे यासाठी आग्रही असलेले इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे या कार्यक्रमातील आणखी एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना माणसांसारखं वागवलं पाहिजे. कंपन्यांमध्ये सर्वात कमी पगार आणि सर्वाधिक पगारातील तफावत कमी केली पाहिजे.”
कर्मचाऱ्याचा आदर आणि प्रतिष्ठा
यावेळी त्यांनी सांगितले की, “प्रत्येक कॉर्पोरेट कर्मचाऱ्याचा आदर आणि प्रतिष्ठा राखण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांचे कौतुक जाहीरपणे केले पाहिजे आणि टीका खाजगीत. शक्य तितका कंपन्यांचा नफा सर्व कर्मचाऱ्यांमध्ये न्याय्य पद्धतीने वाटला पाहिजे. भविष्यात भारताचा विकास होण्यासाठी आणि गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी, दयाळू भांडवलशाहीचा अवलंब करणे आवश्यक आहे.”