गेल्या वर्षभराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या असून, आपण सर्वांनी मोदी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे सांगत इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले.
मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण होते आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण मूर्ती यांनी सरकारची पाठ थोपटली. ते म्हणाले, मोदी यांच्या रुपाने कठोर परिश्रम घेणारे आणि उत्साही पंतप्रधान आपल्याला मिळाले आहेत. लोकांनी, सर्व पक्षांनी, विरोधकांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मला असं वाटतंय की गेल्या वर्षात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. आपण सर्वजण मोदींमागे उभे राहिलो, तर देशात अजूनही चांगल्या गोष्टी घडतील, असा मला विश्वास आहे.
देशात पारदर्शक करपद्धती अंमलात आणली गेली पाहिजे आणि पूर्वलक्ष्यी प्रभावाने करआकारणी करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी सरकारकडून व्यक्त केली. कर आकारणीची पद्धत पारदर्शक असल्यास त्यामुळे लोकांमध्ये सरकारबद्दल विश्वासाची भावना निर्माण होऊ शकते आणि तेही करचुकवेगिरी टाळतात, असेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayana murthy praises narendra modi govt