Narayana Murthy On Employees Salary: कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ७० तास काम करावे यासाठी आग्रही असलेले इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे आणखी एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना माणसांसारखं वागवलं पाहिजे. कंपन्यांमध्ये सर्वात कमी पगार आणि सर्वाधिक पगारातील तफावत कमी केली पाहिजे.” ते टायइकॉन मुंबई २०२५ शिखर परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी सांगितले की, “प्रत्येक कॉर्पोरेट कर्मचाऱ्याचा आदर आणि प्रतिष्ठा राखण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांचे कौतुक जाहीरपणे केले पाहिजे आणि टीका खाजगीत. शक्य तितका कंपन्यांचा नफा सर्व कर्मचाऱ्यांमध्ये न्याय्य पद्धतीने वाटला पाहिजे. भविष्यात भारताचा विकास होण्यासाठी आणि गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी, दयाळू भांडवलशाहीचा अवलंब करणे आवश्यक आहे.”

दयाळू भांडवलशाही म्हणजे भांडवलशाहीचे एक मॉडेल आहे, ज्यामध्ये केवळ नफा कमविण्यावर लक्ष केंद्रित केले जात नाही. त्याऐवजी, समाज आणि पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी देखील जपली जाते.

नारायण मूर्ती पुढे म्हणाले, “भांडवलशाही म्हणजे लोकांना नवीन कल्पना आणण्याची संधी देणे जेणेकरून ते स्वतःसाठी आणि त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी पैसे कमवू शकतील. असे काम करणे ही आपली जबाबदारी आहे, जेणेकरून सर्वजण म्हणतील भांडवलशाही चांगली आहे. हे करण्यासाठी, आपण सर्वांना कृती करण्याची गरज आहे, फक्त मोठ्या गोष्टी बोलून काहीही साध्य होणार नाही.”

कामाच्या तासांबाबत भूमिका

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती त्यांच्या भूमिका व व्यवसायाकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टीकोनामुळे नेहमीच चर्चेत असतात. मागील काही काळात, कर्मचाऱ्यांनी आठवड्यात किती तास काम केलं पाहिजे? यासंदर्भात केलेल्या विधानामुळे बरीच चर्चा झाली होती. अनेकांनी नारायण मूर्तींच्या या भूमिकेवर टीकाही केली होती. त्यानंतरही नारायण मूर्तींनी त्यांची भूमिका ठाम ठेवली होती.

आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला

मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांचं हे वक्तव्य अनेक दिवस चर्चेत राहिलं. त्यावर देशभरात साधकबाधक चर्चा देखील झाली. त्यामध्ये प्रामुख्याने मूर्ती यांना ट्रोल केलं गेलं. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. यावर स्पष्टीकरण देताना नारायण मूर्ती म्हणाले, “कोणालाही जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडणे हा त्यामागचा उद्देश नव्हता. मी केवळ तरुणांना आत्मपरिक्षणाचा सल्ला म्हणून तसं वक्तव्य केलं होतं”.