Narayana Sudha Murthy to visit son in law Rishi Sunak at 10 Downing Street: भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सासू-सासरे आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती, सुधा मूर्ती लवकरच ब्रिटनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यात आहे. पंतप्रधान सुनक यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या १० डाऊनिंग स्ट्रीटला मूर्ती दांपत्य भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. ४२ वर्षीय ऋषी सुनक यांनी नारायण आणि सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तींशी लग्न केलं आहे. सध्या पंतप्रधानपदी विराजमान असलेले सुनक हे १० डाऊनिंग स्ट्रीट या ब्रिटीश पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानात आपली पत्नी आणि दोन मुली कृष्णा, अनुष्काबरोबर वास्तव्यास आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी तसेच लेखिका, समाजसेविका सुधा मूर्ती यांनी मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीमध्ये या भेटीसंदर्भातील सूचक विधान केलं आहे. मुलगी अक्षता आणि नातींना भेटायला जाणार असल्याचं म्हटलं आहे. खास करुन आपल्या नाती म्हणजेच कृष्णा आणि अनुष्काला भेटण्यासाठी आम्ही आतुर असल्याचं या दोघांनी सांगितलं.

१० डाऊनिंग स्ट्रीटमधील घरी मुलगी आणि जावयाला भेटायला जाणार असल्याचं सांगताना नारायण मूर्तींनी, “किंवा ते (ऋषी सुनक आणि कुटंबीय) इथे येतील. जसं ठरेल तसं करु,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. काही आठवड्यांपूर्वीच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या सुनक यांना शुभेच्छा देताना नारायण मूर्तींनी आम्हाला त्याचा अभिमान वाटतो असं म्हटलं होतं. “ऋषीचं अभिनंदन. आम्हाला त्याचा फार अभिमान वाटतोय आणि त्याला यश मिळो अशा शुभेच्छा देतो. तो युनायटेड किंग्डममधील लोकांसाठी चांगलं काम करेल,” असं नारायण मूर्ती म्हणाले होते.

एका जुन्या मुलाखतीमध्ये ऋषी सुनक यांनी मुक्तपणे आपल्या भारतीय कनेक्शनसंदर्भात भाष्य केलं होतं. “मी जनगणेच्या वेळी ब्रिटीश इंडियनसमोर टीक करतो. आपल्याकडे अशी कॅटेगरी आहे. मी पूर्णपणे ब्रिटीश आहे. हे माझं घर आणि देश आहे. मात्र माझा धार्मिक आणि संस्कृतिक वसा हा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी खुलेपणानं सांगतो की मी हिंदू आहे,” असं सुनक म्हणालेले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayana sudha murthy to visit son in law rishi sunak at 10 downing street scsg