सरदार पटेलांवरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात पडलेली ठिणगी दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. या वादात गुरुवारी केंद्रीय मंत्री व्ही. नारायणसामी यांनी उडी घेतली. सरदार पटेलांवरून भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले राजकारण केविलवाणे असल्याची टीका नारायणसामी यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारताच्या पंतप्रधानांनी ‘सरदार पटेल हे धर्मनिरपेक्ष नेते होते’ असे विधान केले होते. सरदार एक लोहपुरुष होते आणि त्यांनी आपली कर्तव्ये चोख बजावली होती. असे असताना भाजप मात्र या मुद्दय़ाचे गलिच्छ राजकारण करीत आहे, अशी टीका नारायणसामी यांनी केली.
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात कोणतेही मतभेद नव्हते, उलट त्यांच्यात उत्तम समन्वय होता. असे असतानाही, या दोघांवरून केले जाणारे राजकारण अत्यंत केविलवाणे असल्याचे नारायणसामींनी म्हटले आहे.
२९ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे झालेल्या सभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी ‘सरदार पटेल जर भारताचे पंतप्रधान झाले असते तर भारताचे भविष्य आणि देशाचे चित्र वेगळे दिसले असते, असे विधान केले होते. त्यावरून विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना नारायणसामींनी भाजपावर टीकास्त्र सोडले.
पटेल खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष
सरदार वल्लभभाई पटेल यांची धर्मनिरपेक्षता ही गांधीजींच्या तोडीची होती. १९४७ च्या दरम्यान दिल्लीत झालेल्या जातीय हिंसाचारात आपण हे पाहिले आहे. हिंसाचारामुळे भयभीत झालेल्या दहा हजार मुस्लिमांना त्यांनी लाल किल्ल्यात सुरक्षित ठेवले. मुस्लिमांच्या संरक्षणासाठी त्यांनी त्या वेळी पुणे व मद्रास येथून लष्करी तुकडय़ा आणल्या होत्या. गृहमंत्री म्हणून त्यांनी त्या वेळी सर्वोत्तम कामगिरी केली होती. निझामुद्दीनला स्वत:हून जाऊन त्यांनी प्रार्थना केली होती. त्यांनाही या देशात तुमच्याइतकेच अधिकार आहेत हाच संदेश त्यांना द्यायचा होता.
शशी थरूर, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री.
पटेलांसारखे ऐक्य मोदीच निर्माण करतील
मोदी महान नेते असून ते जात, धर्म, भाषा यांच्या पलीकडे जाऊन देशात ऐक्य निर्माण करू शकतात़ देशाला आता सरदार पटेल यांच्याच ‘खऱ्या धर्मनिरपेक्षते’ची आवश्यकता आहे, तुष्टीकरणाच्या धोरणामुळे भाजप वगळता सर्व पक्ष देशाच्या विभाजनाला कारणीभूत होत आहेत़ त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवारम्हणून मोदी यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत़.
अशोक सिंघल, ज्येष्ठ नेते, विहिंप़़