गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासोबतच लोकसभा निवडणुकीसाठी डावपेचांची आखणी करीत आहेत. पक्षांतर्गत कल समजून घेण्यासाठी मोदी भाजपच्या प्रत्येक खासदाराला गुजरातमध्ये वैयक्तिक भेटीसाठी निमंत्रित करीत आहे. या भेटीत मोदी विद्यमान खासदाराची दुसऱ्यांदा निवडून येण्याची शक्यता चाचपडून पाहत असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राची जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी नवसारीचे खासदार सी.आर. पाटील यांच्याकडे सोपवली आहे. मूळचे जळगाव जिल्हयातील रहिवासी असणारे पाटील कट्टर मोदी समर्थक आहेत. त्यांच्यामार्फत महाराष्ट्रातील खासदारांना मोदी वैयक्तिक भेटीसाठी अहमदाबादला निमंत्रित करीत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या या गाठीभेटींमधून स्थानिक राजकीय परिस्थितीचा अंदाज मोदी घेत आहेत. महाराष्ट्रातील नऊ भाजप खासदारांपैकी दोन खासदारांनी मोदींशी भेट झाल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. लोकसभेतील भाजपच्या ११६ खासदारांना मोदींनी वैयक्तिक निमंत्रण दिले आहे.
विशेष म्हणजे या भेटीचा वृत्तांत कोठेही प्रसिद्ध करू नका, अशी ‘विनंती’ मोदी यांनी भाजप खासदारांना केली. त्यामुळे प्रसारमाध्यमांसह सोशल नेटवर्किंग साईटवरदेखील मोदी यांच्यासमवेतचा फोटो संबधित खासदारांनी टाकलेला नाही. पंतप्रधानदाची उमेदवारी घोषीत होण्यापूर्वी मोदी या गाठीभेटी घेत आहेत. प्रत्येक खासदाराला भेटून पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा खुंटा बळकट करण्याची मोदींची धडपड होती.
संबधित खासदाराच्या मतदारसंघातील समस्या, राजकीय परिस्थितीची माहिती, मागील निवडणुकीत झालेला खर्च, संभाव्य खर्च आदी बाबींवर मोदी खासदारांशी चर्चा करतात. या माहितीच्या आधारावर मोदी संबधित राज्यासाठी निवडणुकीचे डावपेच निश्चित करीत आहेत. भाजप मोदींच्या हाती एकवटल्याने दुसऱ्यांदा उमेदवारी मिळण्यासाठी भाजपचे विद्यमान खासदार अहमदाबादला हजेरी लावून येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा