भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी वाराणसीत काँग्रेसवर टीकांचा भडीमार करत गंगा नदीच्या शुद्धीकरण मुद्द्यावरून यूपीए सरकारला धारेवर धरले.
निवडणुकीपूर्वीचे देशातील सध्याचे वातावरण ऐतिहासीक ठरणारे असल्याचे सांगत मोदींनी देशभर सध्या भाजपचाच बोलबाला सुरू असल्याचे म्हटले. ज्या सरकारला गंगा नदी सांभाळता आली नाही ते सरकार देश काय सांभाळणार? असा सवालही मोदींनी वाराणसीमध्ये उपस्थित केला. भारत सरकारसाठी गंगा नदी ही फक्त नदी असेल, पण आमच्यासाठी गंगा नदी मातेप्रमाणे आहे. येत्या निवणुकीनंतर यूपीए सरकारही वाहून जाईल असेही मोदी म्हणाले.
गंगा नदीच्या शुद्धीकरण मुद्द्यावरून आतापर्यंत सरकारच्या तिजोरीतून कोट्यावधी रूपये उधळले, पण शुद्धीकरण काही झाले नाही. याचे केंद्र सरकारने जनतेला उत्तर द्यावे. पंतप्रधानांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे इतका पैसा गेला कुठे? आणि काम कुठवर झाले? असेही मोदी म्हणाले.
चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होणे यात काही पाप आहे का? असा प्रश्न विचारत माझ्यावर चहाविकणाऱयाचा ठपका मंजूर, पण देश विकणे कदापिही मंजूर नाही असे म्हणत काँग्रेस देशाला विकायला निघाला असल्याचे टीकास्त्रही मोदींनी केले.