काश्मिरातील फुटीरवादी नेत्यांशी पाकिस्तानी राजदूताने केलेल्या चर्चेमुळे गेल्या वर्षांपासून खोळंबलेला भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संवाद शुक्रवारी पुन्हा एकदा सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात येथे तब्बल दीड तास चर्चा झाली. त्यात मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजाला गती देण्यास पाकिस्तानने तयारी दर्शवली. तसेच पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या सार्क देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मोदी यांना देण्यात आले.
येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेच्या निमित्ताने मोदी व शरीफ यांच्या द्विपक्षीय चर्चा झाली. नियोजित वेळापत्रकानुसार सुमारे पाऊण तास ही चर्चा चालणार होती. मात्र, प्रत्यक्षात उभय नेत्यांनी दीड तास द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. या चर्चेला गुरुवारी पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबाराच्या घटनेची पाश्र्वभूमीही होती. मोदी पाकिस्तानला खडे बोल सुनावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, उभय नेत्यांनी संयमी धोरण स्वीकारत दोन्ही देशांमध्ये ठप्प झालेल्या संवादाला पुन्हा एकदा चालना देण्याला प्राधान्य दिले. मोदी व शरीफ यांच्यातील चर्चा दहशतवादाच्या प्रश्नावर केंद्रित होती. या समस्येमुळेच द्विपक्षीय संबंधांत अडथळे येत असल्याचे पाकला सांगण्यात आले.
मोदी व शरीफ यांच्या बैठकीनंतर पाच कलमी दिशादर्शन आराखडा जाहीर करण्यात आला असून दोन्ही देशांनी मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानात चालू असलेल्या खटल्यास गती देण्याचे ठरवले आहे. दहशतवाद्यांच्या आवाजाचे नमुने व इतर माहिती तातडीने देण्याचे ठरवण्यात आले. सीमा सुरक्षा दलांचे महासंचालक व पाकिस्तानी रेंजर्सचे समपदस्थ यांची बैठक तातडीने घेणे, त्यानंतर लष्करी कारवाई महासंचालकांची बैठक घेणे हे महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले.

शरीफ यांच्यावर टीकास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना काश्मीरच्या मुद्दय़ाला पूर्णपणे बगल देण्यात आल्यामुळे पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी नवाझ शरीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. उभय देशांच्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा मुद्दा उपस्थित न होणे संशयास्पद असल्याचे मत पाकचे माजी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी व्यक्त केले. तर काश्मीरच्या मुद्दय़ावरून भारत पाकिस्तानात अस्थितरता माजवत असल्याचा आरोप सिनेटर सेहर कामरान यांनी केला.

पुढे काय?
* राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल व पाकचे सरताज अझीझ यांच्यात आगामी काळात दहशतवादाच्या मुद्दय़ावर चर्चा
* २०१६ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या सार्क देशांच्या परिषदेला मोदी उपस्थित राहणार
* धार्मिक पर्यटनावर भर देऊन त्यासाठी सुलभता निर्माण करण्यात येणार
* दोन्ही देशांच्या तावडीत असलेल्या मच्छिमारांना येत्या १५ दिवसांत मुक्त करणार

Story img Loader