नवी दिल्ली : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी ‘मेरा युवा भारत’ या संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. राष्ट्रउभारणीसंबंधित उपक्रमांत तरुणांना सक्रियपणे सहभागी होण्याची संधी या संस्थेद्वारे दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या मासिक संवाद सत्राच्या १०६ व्या भागात मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना मोदींनी गेल्या काही वर्षांत खादीशी संबंधित उत्पादनांच्या विक्रीत झालेल्या उल्लेखनीय वाढीचा उल्लेख केला. त्यांनी या वेळी पुन्हा देशवासीयांना अधिकाधिक स्थानिक स्तरावर उत्पादित केलेली उत्पादने खरेदी करण्याचे आणि ‘स्वावलंबी भारत’चा संकल्प सिद्धीस नेण्याचे आवाहन केले.
हेही वाचा >>>आंध्र प्रदेशात भीषण अपघात; दोन रेल्वेंची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू, ४० जण जखमी
मोदी म्हणाले की, ‘मन की बात’द्वारे देशवासीयांसाठी काही तरी करण्याची तळमळ असलेल्या युवकांसाठी एक आनंदाचे वृत्त सांगणार आहोत. माझ्या तरुण मित्रांनो, ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. अवघ्या दोन दिवसांनी म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी एका खूप मोठय़ा देशव्यापी संघटनेचा पाया रचला जाणार आहे.