पूर्वी देशभरातील पर्यटक काश्मीरमध्ये येत असत, भारताचा स्वर्ग म्हणून असलेली जुनी ओळख काश्मीरला परत मिळवून देण्याचे माझे स्वप्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते शनिवारी श्रीनगर येथे बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी ८०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या पैशांच्या माध्यमातून येथील तरूणांना रोजगार मिळून काश्मीरचा चेहरामोहरा बदलला पाहिजे, असे मोदींनी सांगितले. काश्मीरने अनेक संकटे आणि यातना झेलल्या आहेत. येथील अनेक पिढ्यांची स्वप्ने मातीमोल झाली आहेत. त्यामुळेच मला काश्मीरचे जुने दिवस परत आणायचे आहेत. काश्मीरशिवाय भारत अपूर्ण आहे. सचिन, सेहवाग किंवा धोनी मैदानावर ज्या बॅटने षटकार लगावतात ती प्रत्येक बॅट काश्मीरमध्ये बनवण्यात आलेली असते, असे सांगत मोदींनी काश्मिरी जनतेला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. भारताच्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी देशाच्या प्रत्येक भागातली लोकांनी योगदान देणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

Story img Loader