ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अन्य नेत्यांचा विरोध झुगारून भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारप्रमुखपदी रविवारी निवड केली. गुजरातमधील सत्तेची हॅट्ट्रिक आणि विविध सर्वेक्षणांमधून उघड झालेली लोकप्रियता यांच्या जोरावर स्वार होऊन पंतप्रधान पदाची दावेदारी ठोकणाऱ्या मोदींसाठी हे ‘त्या’ खुर्चीच्या दिशेने मोठे पाऊल समजले जात आहे. मात्र, मोदींच्या या निवडीला अडवाणींसह भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांचा विरोध असल्याने त्यांच्या मार्गात काही अडथळे येण्याचीही शक्यता आहे.
भ्रष्टाचार आणि महागाई या मुद्दय़ांवर काँग्रेसप्रणित यूपीए सरकारविरोधात जनतेत तीव्र असंतोष असतानाही त्याचे सत्ता मिळवण्यात रूपांतर करण्यात भाजपला गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत यश आलेले नाही. या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता व कार्यकर्त्यांची पसंती या गोष्टी डोळय़ांसमोर ठेवून भाजपने रविवारी गोव्यात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींना प्रचारप्रमुख पदी नेमण्याचा निर्णय घेतला. ‘२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतील आव्हाने लक्षात घेऊन विजय मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी यांची भाजपच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे,’ असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी जाहीर केले. तेव्हा टाळय़ांच्या कडकडाटात तसेच उभे राहून सदस्यांनी मोदींचे अभिनंदन केले. परंतु, ‘प्रकृती अस्वास्थ्याच्या’ कारणावरून अडवाणी यांनी बैठकीला येणे टाळले. तसेच उमा भारती, यशवंत सिन्हा, जसवंत सिंग आणि शत्रुघ्न सिन्हा या ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली.
मोदी यांची प्रचारप्रमुख पदी निवड होण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदींना विरोध केल्याने त्याबाबतची उत्कंठा वाढली होती. पक्षांतर्गत विरोध पाहता, हा निर्णय लांबणीवर टाकण्याचा विचारही भाजप पक्षश्रेष्ठींमध्ये सुरू होता. मात्र, तसे केल्यास कार्यकर्त्यांचे नीतीधैर्य खच्ची केल्यासारखे होईल, अशी भूमिका काही नेत्यांनी मांडल्यानंतर मोदींच्या निवडीचा निर्णय झाला. मोदींच्या या निवडीबद्दल अडवाणींनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, ‘मी अडवाणीजींशी बोललो व त्यांचे आशीर्वाद घेतले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,’ असे मोदी यांनी ट्विटरवरून जाहीर केले.
भाजपचे नमो नम:
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अन्य नेत्यांचा विरोध झुगारून भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारप्रमुखपदी रविवारी निवड केली. गुजरातमधील सत्तेची हॅट्ट्रिक आणि विविध सर्वेक्षणांमधून उघड झालेली लोकप्रियता यांच्या जोरावर स्वार होऊन पंतप्रधान पदाची दावेदारी ठोकणाऱ्या मोदींसाठी हे ‘त्या’ खुर्चीच्या दिशेने मोठे पाऊल समजले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-06-2013 at 05:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi appointed on campaign committee chief post