राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची मालिका सुरू असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नेत्यांनीही त्यात उडी घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर होत असलेल्या आरोपांमागे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा हात असू शकतो, अशी शंका ‘आरएसएस’चे नेते मा. गो. वैद्य यांनी म्हटले आहे. भाजपते नेते राम जेठमलानी यांच्या पत्रकार परिषदेवर भाष्य करताना मा. गो. वैद्य यांनी आपल्या ब्लॉगवर हा संशय व्यक्त केला आहे.
भाजपचे खासदार आणि जेष्ठ विधितज्ञ राम जेठमलानी यांनी गडकरी यांच्या राजीनाम्याची आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याचीही मागणीही केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी हे जेठमलानी यांना वापर करून घेत आहेत, असा संशय वैद्य यांनी आपल्या ब्लॉगमध्ये व्यक्त केला आहे.
नितीन गडकरी आणि भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, नरेंद्र मोदींनी अद्याप याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, असेही वैद्य यांनी म्हटले आहे.  
दरम्यान, मा. गो. वैद्य यांचे हे मत वैयक्तीक असल्याचे ‘आरएसएस’चे नेते राम माधव यांनी म्हटले आहे.

Story img Loader