हैदराबाद : देशाच्या राजकारणाची दिशा तुष्टीकरणाकडून तृप्तीकरणाकडे नेण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मांडले. हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचण्याबरोबरच देशभर ‘स्नेहयात्रा’ काढण्याची सूचना मोदींनी केली. काँग्रेस २ ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपचे हे मोठे पाऊल मानले जात़े

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या राजकीय प्रस्तावात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर टीका करण्यात आली. हाच धागा जोडून घेत मोदींनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात, नवी राजकीय संस्कृती निर्माण करण्याचा मुद्दा मांडला. बहुसंख्यच नव्हे तर, अन्य समाजाशीही भाजपने समन्वय साधला पाहिजे, त्यांच्याबद्दल आत्मीयता दाखवली पाहिजे. स्नेहयात्रा ही सद्भावना यात्रा असली पाहिजे, असा संदेश मोदींनी भाजपच्या कार्यकारिणीतील सदस्यांना दिला.

हैदराबादमधूनच सरदार पटेलांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेचा पाया रचला होता. भारत एक आहे, आता श्रेष्ठ बनवण्याकडे वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी जनतेचे हित आणि सुशासन हा द्वीसूत्री कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्याद्वारे ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’चे ध्येय गाठायचे आहे म्हणजेच देशाला तृप्तीकरणाकडे घेऊन जायचे आहे, असे मोदींनी स्पष्ट केल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेससारखे काही पक्ष स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत पण, त्यावर भाजपने हास्य वा व्यंग करू नये. त्यांच्या चुका भाजपने करू नयेत. काँग्रेससारख्या पक्षांच्या घराणेशाहीला लोक कंटाळले आहेत. २००४ ते २०१४ हा दहा वर्षांचा धोरणलकव्याचा, भ्रष्टाचाराचा काळ भाजपने आणि देशानेही विसरू नये, असेही मोदी म्हणाले.

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी ऐतिहासिक असून, आदिवासी समाजातील महिलेची निवड उचित आहे. वंचित, शोषित समाजातील महिलेला देशाचे सर्वोच्च पद भूषवण्याची संधी मिळू शकेल. मुर्मू यांची संघर्षकथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.

Story img Loader