नवी दिल्ली : कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रचारसभा २८ एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर ७ मे पर्यंत मोदींचे झंझावाती दौरे राज्यभर आयोजित करण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन्ही दिग्गज नेते सध्या कर्नाटकमध्ये जाहीरसभा तसेच, रोड शो घेत आहेत. पण, भाजपसाठी मोदी हेच निवडणुकीचा चेहरा असल्याने त्यांच्या सहभागानंतर भाजपच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने गती मिळेल. मोदी सहा दिवसांमध्ये १२ ते १५ जाहीरसभा व रोड शो घेणार आहेत. मोदी २८ व २९ एप्रिल, ३ व ४ मे तसेच, ६ व ७ मे अशी तीन टप्प्यांमध्ये प्रचार करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवडय़ामध्ये भाजपने ४० नेत्यांचा समावेश असलेल्या तारांकित प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश असून योगी बुधवारपासून कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचार सुरू करतील. योगींच्या बुधवारी तीन जाहीरसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. २०१७ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये योगी आदित्यनाथ यांचा आक्रमक प्रचार आकर्षण ठरले होते. यावेळी कर्नाटकमध्ये हिजाब, हलाल यासारख्या वादग्रस्त विषयांवर अधिक भर न देण्याचे भाजपने ठरवले असल्याने योगींच्या भाषणातील मुद्दय़ांची उत्सुकता असेल. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करोनामुक्त झाले असून तेही बुधवारी कर्नाटक दौऱ्यावर असतील.कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी होईल. भाजपसाठी कर्नाटक राज्य दक्षिण भारताचे प्रवेशद्वार असून इथे सत्ता राखण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi campaign rally from friday yogi adityanath three public meetings today amy
Show comments