भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून देशाने आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दर्शविली आहे. तथापि, याबाबतचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाने घ्यावयाचा आहे, असे पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा स्मृती इराणी यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
देशवासीयांना काय हवे आहे त्याची आम्हाला कल्पना आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे त्याचीही आम्हाला कल्पना आहे. मात्र पक्षाच्या संसदीय मंडळाला काय हवे आहे त्याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत, असेही इराणी म्हणाल्या.
पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता इराणी म्हणाल्या की, आपण याला दुजोरा देऊ शकत नाही अथवा त्याचा इन्कारही करू शकत नाही. बैठकीत घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती मीडियाला देण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
मीडियाने लालकृष्ण अडवाणी विरुद्ध नरेंद्र मोदी असे चित्र रंगविले असून ते अयोग्य असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. पक्षाच्या सर्व बैठका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘पंतप्रधानपदासाठी मोदींच्या उमेदवारीचा निर्णय संसदीय मंडळाला घ्यायचाय’
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून देशाने आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दर्शविली आहे. तथापि, याबाबतचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाने घ्यावयाचा आहे, असे पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा स्मृती इराणी यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
First published on: 07-06-2013 at 06:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi can be bjps prime ministerial candidate smriti irani