सर्वत्र टीकेचे सूर उमटत असतानाही गुजरात दंगलीच्या कलंकाबाबत चकार शब्दही बोलण्याचे टाळणारे गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आता उत्तरेत आपल्या प्रतिमासंवर्धनासाठी चक्क पठाणी कुर्ता पेहेनणार आहेत! मोदी लवकरच उत्तर भारताचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पठाणी कुर्ता आणि सलवार या पेहेरावात दिसतील. त्यांच्या नेहमीच्या टेलरनेच ही माहिती दिली आहे.
अध्र्या बाह्य़ांचा कुर्ता आणि साधी सलवार अशा पेहेरावांत ‘मित्रों..’ म्हणत भाषणाला सुरुवात करणारे मोदी ही नरेंद्र मोदींची छबी जनमानसांत घट्ट बसली आहे. मात्र, आता या छबीला छेद देण्याचाच मोदींचा विचार आहे. त्यामुळेच दिल्लीसह उत्तरेतील इतर राज्यांत प्रतिमासंवर्धनासाठी आखलेल्या मोहिमेत मोदींनी जाणीवपूर्वकपणे पठाणी कुर्त्यांची निवड केली आहे. येथील जेड ब्ल्यू या नामांकित टेलिरग दुकानाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन चौहान यांनी ही माहिती दिली आहे. ‘नरेंद्रभाईंनी १९९४ मध्ये अशाच प्रकारचा कुर्ता माझ्याकडून शिवून घेतला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी अध्र्या बाह्य़ांचा कुर्ता आणि साधी सलवार असा पेहराव करण्यास सुरुवात केली. त्याला नंतर ‘मोदी कुर्ता’ असे नाव पडले. अलीकडेच नरेंद्रभाईंनी पठाणी कुर्ता शिवण्याची ‘ऑर्डर’ दिली आहे.’ चौहान सांगतात. दिल्लीच्या थंडीत ‘मोदी कुर्त्यां’ चा काही निभाव लागणार नाही त्यामुळेच त्यांनी पठाणी कुर्ता शिवण्यास सांगितले असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
आताच का? : गुजरातमध्ये सामाजिक सलोखा राहावा, शांतता नांदावी यासाठी दोन वर्षांपूर्वी आयोजित सद्भावना यात्रेदरम्यान मुस्लिमांची ओळख असलेली ‘स्कल कॅप’ घालण्यास मोदींनी कडवा विरोध दर्शवला होता. मात्र, आता मतांची गरज असल्यानेच उत्तर भारतातील मुस्लिमांचा मुख्य पेहेराव असलेल्या पठाणी कुर्त्यांला मोदींनी प्राधान्य दिले असावे. देशाला देवालयांची नाही तर शौचालयांची जास्त गरज आहे, असे विधान करून मोदींनी त्यांच्यातील आक्रमक हिंदुत्वाला मुरड घालत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या पाश्र्वभूमीवर पठाणी कुर्ता हे त्याचे पुढचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यापुढे मोदी पठाणी कुर्त्यांत भाषणाला उभे राहिल्यास आश्चर्य वाटायला नको.