अब्दुल्ला, मुफ्ती यांना मोदींचा इशारा; काँग्रेसवरही टीकास्त्र

पाकिस्तानने दिलेल्या अणुबॉम्बच्या धमकीचा फुगा फुटल्याप्रमाणे जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडण्याची विरोधकांची इच्छाही उघड झाली आहे. परंतु आम्ही त्यांना तसे करू देणार नाही, असा इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि ‘पीडीपी’वर टीकास्त्र डागले.

अब्दुल्ला आणि मुफ्ती या दोन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरच्या तीन पिढय़ा बरबाद केल्या, आता त्यांना देशाचे तुकडे करू देणार नाही, असा इशारा मोदी यांनी दिला. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स  डेमॉक्रॅटिक पार्टीचा उल्लेख न करता मोदी त्यांना उद्देशून म्हणाले, ‘ते आम्हाला दोन पंतप्रधान निवडण्याची धमकी देत आहेत, परंतु मी त्यांना एकदाच सर्व काही स्पष्ट करतो की, जम्मू-काश्मीर त्यांना वारसाहक्काने मिळालेले राज्य नाही. तो भारताचा एक अविभाज्य भाग आहे. तेथील प्रत्येक मूल भारतीय आहे.’

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरला वेगळा पंतप्रधान असला पाहिजे, असे वक्तव्य केले होते, तर माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी घटनेतील ३७० वे कलम रद्द न  करण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात मोदी म्हणाले, की अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंबीयांनी जम्मू-काश्मीरला ओलीस ठेवले, ते आता जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडू इच्छितात, पण आता या राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या दोन्ही कुटुंबांना सत्तेपासून दूर ठेवा. ते दूर राहिले तरच या राज्याला भवितव्य आहे.

मूठभर लोक जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना आपल्या दावणीला बांधू शकत नाहीत वा त्यांना बेठबिगार म्हणून राबवू शकत नाहीत, असेही मोदी म्हणाले. पंतप्रधान कार्यालयातील मंत्री आणि उधमपूरचे भाजप उमेदवार जितेंद्र सिंह यांच्या प्रचारसभेत मोदी बोलत होते.

पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये मोठे मतदान झाल्याने दहशतवाद्यांचे म्होरके, संधिसाधू आणि महाभेसळ आघाडीचे नेते निराश झाले आहेत. लोकांनी देशाच्या लोकशाहीची ताकद पहिल्या टप्प्यात दाखवून दिली आहे, असे मोदी म्हणाले. काँग्रेसला लक्ष्य करताना ‘काँग्रेसला जंतुसंसर्ग झाल्याचा टोला मोदी यांनी लगावला. या पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात ‘अफ्स्पा’ कायदा (सशस्र दलांना विषेश अधिकार देणारा कायदा)राज्यातून रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. तसे झाले तर सुरक्षा दलांचे नीतिधैर्य खच्ची होईल. कुणी देशभक्त असे बोलू शकतो का, आपल्या सुरक्षा दलांना काहीतरी संरक्षण नको का?’, असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला.

काँग्रेसने जालियनवाला बाग हत्याकांड शताब्दीचे राजकारण केल्याचा आरोप मोदी यांनी केला. ‘उपराष्ट्रपती जालियनवाला बाग येथे सरकारी कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते, परंतु पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग सहभागी झाले नाही. विरोधकांना राष्ट्रवाद हा त्यांचा अपमान वाटतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये म्हणून अमरिंदर सिंग यांच्यावर कुणाचा दबाव असेल, हे आम्ही ओळखू शकतो. मी त्यांना बऱ्याच काळापासून ओळखतो. त्यांच्या देशभक्तीविषयी मी कधीच शंका घेतलेली नाही. पण एका कुटुंबावरील भक्तीतून त्यांच्यावर तसे करण्यासाठी दबाव आला असावा,’ अशी टीका मोदी यांनी केली.

भारताला धमकावण्याचे दिवस आता गेले आहेत. दहशतवाद्यांना मारण्यासाठी आणि त्यांच्या पाठीराख्यांचा पर्दाफाश करण्यासाठी पाकिस्तानात घुसणारा हा नवा भारत आहे. तुम्ही मतदान करून केवळ एक खासदार निवडणार नाही तर या देशाचे नवे धोरण आणि नव्या पद्धतीलाच निवडणार आहात, असे भावनिक आवाहन मोदी यांनी केले.

२०१६ मधील लक्ष्यभेद हल्ले आणि बालाकोट हवाई कारवाईचा संदर्भ देत मोदी यांनी, काँग्रेसने कधीच भारतीय लष्करी दलांवर विश्वास दाखवलेला नाही, असा आरोप केला. काँग्रेससाठी लष्कर हा केवळ पैसा मिळवण्याचा एक मार्ग आहे. काश्मिरी पंडितांनी काश्मीर खोऱ्यातून स्थलांतर केले त्याला काँग्रेसच जबाबदार आहे. भाजप मात्र त्यांना त्यांच्या मूळ गावी नेऊन त्यांचे पुनर्वसन करील, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.

१९८४ मध्ये शीख दंगली घडवून आणणारा पक्षच आता न्यायाची भाषा करीत आहे, पण त्यांच्याकडून कुणालाही न्याय मिळणे अशक्य आहे, अशी टीका मोदी यांनी केली.

मोदी काय म्हणाले?

  • दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यापासून काँग्रेसने लष्कराला रोखले
  • काँग्रेसला भारतीय लष्कराची शक्ती कधीच कळली नाही
  • आम्ही देशाच्या संरक्षणासाठी लष्कराचा वापर केला
  • काँग्रेससाठी लष्कर हे पैसे खाण्या-कमावण्याचे एक साधन होते
  • भारताला धमक्या देण्याचे दिवस संपले आहेत, हा नवा भारत आहे
  • आम्ही दहशतवाद्यांना ठार करू आणि त्यांच्या पाठीराख्यांचा बुरखा फाडू
  • या वेळी देशभर भाजपची हवा आहे
  • भाजपला काँग्रेसपेक्षा तिप्पट जागा मिळतील असे सर्वेक्षण निष्कर्ष आहेत
  • अब्दुल्ला, मुफ्ती कुटुंबांनी जम्मू-काश्मीरच्या तीन पिढय़ा बरबाद केल्या
  • त्यांना भारतापासून जम्मू-काश्मीरला तोडायचे आहे, आम्ही तसे करू देणार नाही

देशविभाजनाचा भाजपचाच कुटिल डाव – मेहबूबा

श्रीनगर: मुस्लीम आणि अल्पसंख्याकांना हद्दपार करून देशाचे तुकडे करण्याचा भाजपचाच कुटिल डाव आहे, असा प्रतिहल्ला ‘पीडीपी’च्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मूतील कथुआ येथील सभेत केलेल्या वक्त व्याचा समाचार घेताना मेहबूबा म्हणाल्या, पंतप्रधान राजकीय घराण्यांवर निवडणुकीत टीका करतात, पण नंतर दूत पाठवून आमच्या पक्षांशी आघाडीचे प्रयत्न करतात. नॅशनल कॉन्फरन्सशी १९९९ मध्ये, तर पीडीपीशी २०१५ मध्ये भाजपने युती केली होती.त्यांना ३७० कलम रद्द करावेसे वाटते तर मग ते सत्तेला महत्त्व का देतात.आघाडय़ा करण्यास दूत का पाठवतात, असा प्रश्न मेहबूबा यांनी केला.