पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. या ठिकाणी औरंगजेब आला, तर शिवाजी देखील उभे राहतात, असं मत मोदींनी व्यक्त केलं. याशिवाय मोदींनी अनेक भारतीय पराक्रमांचाही उल्लेख केला. यावेळी मोदींनी उपस्थितासह देशवासीयांकडून ३ महत्त्वाची वचनं घेतली. तसेच हे वचनं पाळण्याचं आश्वासनही घेतलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आक्रमण करणाऱ्यांनी या नगरीवर हल्ले केले आणि उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. औरंगजेबाने केलेले अत्याचार त्याच्या दहशतीची साक्ष देतात. त्याने तलवारीच्या बळावर येथे बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाच्या मातीत इतर जगापेक्षा काही वेगळं आहे.”

“येथे औरंगजेब आला तर शिवाजी देखील उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची ताकद दाखवून देतात. इंग्रजांच्या काळात देखील काशीच्या लोकांनी हेस्टिंगचे काय हाल केले होते हे येथील लोकांना माहिती आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.

“देशासाठी मला ३ वचनं द्या”

मोदींनी जनतेकडून देशासाठी ३ वचने घेतली. यात स्वच्छता, सृजनशिलता आणि आत्मनिर्भर भारतासाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या वचनांचा समावेश आहे.

“विनाश करणाऱ्यांची शक्ती कधीही भारताच्या शक्ती-भक्तीपेक्षा मोठी असू शकत नाही”

मोदी पुढे म्हणाले, “प्रत्येक भारतीयाच्या हातांमध्ये अकल्पनीय असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची ताकद आहे. आम्हाला तप, तपस्या माहिती आहे. आम्हाला देशासाठी रात्रंदिवस कष्ट करायचं माहिती आहे. आव्हान कितीही मोठं असेना आम्ही भारतीय ते आव्हान पेलू शकतो. विनाश करणाऱ्यांची शक्ती कधीही भारताच्या शक्ती-भक्तीपेक्षा मोठी असू शकत नाही. ज्या दृष्टोकोनातून आपण जगाला पाहतो त्याच दृष्टीकोनातून जग आपल्याला पाहतं हे लक्षात ठेवा.”

“आजचा भारत गुलामगिरीच्या हीन भावनेतून बाहेर पडत आहे”

“अनेक वर्षांच्या गुलामगिरीने आपल्यावर परिणाम केला होता, भारताला हीन भावनेने भरून टाकलं होतं. मात्र, आजचा भारत त्या हीन भावनेतून बाहेर पडत आहे. आजचा भारत केवळ सोमनाथ मंदिराचं सौंदर्यीकरणच करत नाही, तर समुद्रात हजारो किलोमीटर ऑप्टिकल फायबर देखील पसरवत आहे. आजचा भारत केदारनाथचा जिर्णोद्धारच करत नाही, तर स्वतःच्या हिमतीवर अंतराळात भारतीयांना पाठवण्याच्या तयारीत आहे. आजचा भारत केवळ अयोद्ध्येत प्रभु रामांचं मंदीरच बनवत नाही, तर देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज देखील बनवत आहे,” अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.

हेही वाचा : “…और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है ” ; सचिन सावंत यांनी साधला निशाणा!

“भगवान विठ्ठलाच्या कोट्यावधी भक्तांच्या आशिर्वादाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम पालखी मार्गाचं कामही काही आठवड्यांपूर्वी सुरू झालं आहे,” असंही यावेळी मोदींनी नमूद केलं.

Story img Loader