केंद्रातील काँग्रेसप्रणीत सरकार देशातील बिगरकाँग्रेसशासीत राज्यांशी सापत्नभावाने वागते. एवढेच नव्हे तर या राज्यांची आर्थिक कोंडी कशी होईल याची पद्धतशीरपणे आखणीही हे सरकार करते. हा संघ-राज्य पद्धतीला सुरूंग लावण्याचा प्रकार असून त्यामुळे देशाचेच नुकसान होते आहे, अशी खरपूस टीका करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारला धारेवर धरले. त्याचवेळी काँग्रेसप्रणीत यूपीएतून बाहेर पडलेल्या तृणमूल काँग्रेसला चुचकारण्याचे कामही त्यांनी चोखपणे बजावले.
येथील मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित कार्यक्रमात मोदींना पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी केंद्र सरकारच्या सापत्नभावाच्या वागणुकीवर टीकेची झोड उठवताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. यूपीएतून बाहेर पडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता यांनी मोदींच्या पश्चिम बंगाल भेटीला विरोध दर्शवला होता. त्यामुळेच मंगळवारच्या कार्यक्रमात त्या अनुपस्थित राहिल्या. असे असतानाही मोदी यांनी मात्र ममतांवर स्तुतिसुमने उधळली. गेल्या ३२ वर्षांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मार्क्‍सवाद्यांचे राज्य होते. मात्र, या कालावधीत राज्याची पीछेहाट झाली. विकासाच्या मार्गावर भलेमोठ्ठे खड्डे पडले. हे खड्डे भरून काढण्यासाठी ममतादीदींना काही कालावधी जरूर लागेल. मात्र, त्या हे नुकसान भरून काढतील आणि राज्याला प्रगतिपथावर नेतील असा विश्वास असल्याचे मोदी म्हणाले. बिगरकाँग्रेसशासीत राज्य सरकारांशी केंद्रातील काँग्रेसप्रणीत सरकार कायमच सापत्नभावाने वागत आले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. गुजरातमधील विकासकामांत अनेक अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र, गेल्या १२-१३ वर्षांत कठोर प्रशासनाच्या आधारावरच विकासकामांचा धडाका राबवल्याचा उल्लेखही मोदींनी केला. अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात असा सापत्नभाव नव्हता. पश्चिम बंगालच काय कोणत्याही राज्याला अशी तक्रार करायची संधीच मिळाली नाही असेही मोदी म्हणाले. यूपीएच्या सापत्नभावाच्या वर्तणुकीचा उल्लेख करून ममतांना रालोआच्या कळपात खेचण्याचा हा मोदींचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, मोदींनी त्यांच्या राज्यातील अपयश झाकण्यासाठीच केंद्रातील यूपीए सरकारला लक्ष्य करणे चालवले असल्याची टीका पश्चिम बंगाल काँग्रेसने केली आहे. मोदींनी केलेल्या टीकेला काहीच अर्थ नसल्याचा सूरही त्यांनी लावला. तर दिल्लीतील बडय़ा काँग्रेस नेत्यांनीही मोदींची टीका निर्थक असल्याचे सांगत त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

Story img Loader