‘फेक देसी ओबामा’ अशी टीका करणाऱया कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांच्यावर मंगळवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पलटवार केला. २००४ मध्ये गुजरातमध्ये केलेल्या एका भाषणात मोदी यांनी ‘गुजरात कॅन… गुजरात विल…’ अशी घोषणा दिली होती. या भाषणाच्या यूट्यूबवरील व्हिडिओची लिंकच मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर मंगळवारी अपलोड केली. त्याच ट्विटमध्ये मोदी यांनी आपल्याबद्दल दिशाभूल करणारी माहिती देणाऱयांचा प्रचार किती खालच्या स्तराला गेलाय, याची तुम्हाला माहिती मिळेल, असे म्हटले आहे.
हैदराबादमध्ये रविवारी घेतलेल्या सभेमध्ये मोदी यांनी केंद्रातील सत्ताधारी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली होती. एकगठ्ठा मतांसाठी चटावलेल्या कॉंग्रेसला देशाच्या संरक्षणाची कोणतीही पर्वा नसून, कॉंग्रेसच्या हाती देश सुरक्षित आहे, हा विश्वासच लोकांच्या मनातून पुरता ओसरला आहे, अशी टीका मोदी यांनी केली होती. सभेच्या शेवटी मोदी यांनी ‘येस वुई कॅन…’ आणि ‘वुई विल डू…’ अशी घोषणा सभेला उपस्थित असलेल्यांकडून वदवून घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तिथे झालेल्या निवडणुकीत ‘येस वुई कॅन…’ हीच आपल्या प्रचाराचा मुख्य घोषणा केली होती. मोदी यांनी ओबामा यांची घोषणा चोरल्याच्या आशयाचे ट्विट दिग्विजयसिंह यांनी सोमवारी केले होते. ‘आता आपल्याकडे एक फेक देसी ओबामादेखील आहेत. फेकू याची सर्वोत्तम फेक’ या शब्दांत दिग्विजयसिंह यांनी मोदींवर निशाणा साधला होता. त्याला मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले.