वाईट दिवस, वाईट कामे, वाईट वातावरण आता संपले आहे.. तुमच्यामुळे हे वाईट दिवस गेले आहेत. त्या सरकारला आणखी एक वर्ष मिळाले असते तरी देश बुडालाच असता, अशा शब्दांत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवितानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अवतरलेल्या ‘अच्छे दिना’ची ग्वाही दिली. आपले सरकार गरीबांच्या कल्याणासाठी असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

जनसंघाचे तत्वचिंतक दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मगावी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने सोमवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. वर्षपूर्तीनिमित्ताने भाजपने देशभर दोनशे सभांचे आयोजन केले आहे. त्यातलीच ही पहिला सभा होती. ‘भारत माता की जय’ असा घोष करून मोदींनी आपल्या भाषणास सुरूवात केली. सरकारने वर्षभरात केलेल्या विविध कार्यक्रमांची आणि योजनांची जंत्री त्यांनी या वेळी सादर केली. आपण ‘प्रधानमंत्री, प्रधान सेवक आणि प्रधान ट्रस्टी’ असल्याची ग्वाही देतानाच त्यांनी सत्तांतर झाल्यानंतरच्या वर्षभरात देशात एकही घोटाळा झालेला नसून, आपण दिल्लीतील सत्ता वर्तुळ, दलाल संस्कृती आणि नातेवाईकशाही नामशेष केल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, अभिमन्यूला केवळ आठ वर्तुळांचा विनाश करायचा होता. येथे शेकडो सत्तावर्तुळे होती. पण तुमच्या आशीर्वादाने ती सगळी उध्वस्त करण्यात आली आहेत. ज्यांनी देशाची लूट केली त्यांना चांगले दिवस येतील याची हमी आम्ही दिलेली नाही. आम्ही अशा पद्धतीने काम करणार आहोत की त्यांचे पुढचे दिवस आणखी वाईट असतील. आता भ्रष्टाचाराच्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळत नाही. कुणाचा तरी जावई किंवा मुलगा याचा भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे पाहत आलो. ज्या लोकांना भ्रष्टाचार करायला मिळणार नाही त्यांचे वाईट दिवस सुरू आहेत.
दिल्लीतून मंजूर झालेल्या शंभर पैशांपैकी फक्त १५ पैसे लोकांपर्यंत जातात असे माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते. एनडीएच्या सरकारने मात्र ते शंभर पैसे लोकांपर्यंत जातील अशी व्यवस्था केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुमारे तासाभराच्या भाषणात मोदींनी गरीब व शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सरकारच्या योजनांची माहिती दिली. मात्र वादग्रस्त भूसंपादन विधेयकाचा त्यांनी उल्लेख केला नाही.आपली जडणघडण महात्मा गांधी, लोहिया व दीनदयाळ यांच्या विचारांवर झाली. त्यामुळे या सभेसाठी दीनदयाळ धामची निवड केल्याचे ते म्हणाले.

Story img Loader