नवी दिल्ली: भाजपप्रणित एनडीए आघाडीचा केंद्रातील तिसरा कालखंड दूर नाही. फक्त सव्वाशे दिवस उरले असून अवघा देश ‘अबकी बार चारसो पार’ म्हणू लागला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला ३७० तर, ‘एनडीए’ला चारशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला.
मोदींचे मावळत्या १७ व्या लोकसभेतील हे अखेरचे भाषण होते. सुमारे दोन तासांच्या भाषणामध्ये त्यांनी, भाजपची केंद्रातील पुढील पाच वर्षे देशाच्या आगामी हजार वर्षांच्या समृद्धीसाठी भक्कम पाया रचण्याचा कालखंड असेल, अशी ग्वाही दिली. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नारीशक्ती, युवाशक्ती, गरीब आणि शेतकरी या चार स्तंभांवर लक्ष केंद्रित केले असून हे स्तंभ जितके मजबूत, विकसित होतील तेवढा देश वेगाने समृद्ध होईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>>पाच भारतीयांची ग्रॅमी पुरस्कारांवर मोहर; झाकीर हुसेन तीन, तर राकेश चौरसिया दोन पुरस्कारांचे मानकरी
नेते बदलले, टेपरेकॉर्डर तोच
विरोधकांना देशात काही सकारात्मक होत असल्याचे दिसत नाही, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेत तरी त्यांनी सकारात्मक सूचना करायला हव्या होत्या. पण, ते सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा करत आहेत. उलट, आम्ही विकासामध्ये अल्पसंख्याकांसह सगळय़ांना समावून घेत आहोत. विरोधक मात्र समाजाला, देशाचे विभाजन करण्याच्या प्रयत्नात असतात असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या घराणेशाहीवर हल्ला
विरोधकांच्या दुरवस्थेला काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसला चांगला विरोधक बनवण्याची संधी होती पण, त्यातही हा पक्ष अपयशी ठरला. काँग्रेसने कधीही सक्षम तरुण नेत्यांना संधी दिली नाही.
हेही वाचा >>>आरक्षणावरील मर्यादा हटवण्याचे आश्वासन
काँग्रेसच्या ‘कॅन्सल कल्चर’मुळे नुकसान
काँग्रेस ‘कॅन्सल कल्चर’मध्ये फसलेला आहे. आम्ही म्हणतो मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, लोकल फॉर व्होकल, वंदे भारत, नवे संसद तेव्हा काँग्रेस म्हणतो कॅन्सल. देशाच्या यशप्राप्तीला काँग्रेस सातत्याने नाकारत आहे. मोदीबद्दल राग मनात ठेवून तुम्ही देशाचे यश ‘कॅन्सल’ करत आहात. पण, काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे की, देशाच्या विकासाची, भक्कम आर्थिक स्थितीची अवघे जग प्रशंसा करत आहे.
‘अलायन्स’ची अलायन्मेट बिघडली!
काही दिवसांपूर्वी विरोधकांनी मोळी जोडली होती पण आता एकला चलो रे म्हणत आहेत. काहींनी (राहुल गांधी) मॅकॅनिकचे काम शिकले, ते अलायनमेंटही शिकले असतील. पण, त्यांच्या ‘अलायन्स’चेच (इंडिया) अलायन्मेट बिघडली आहे. या विरोधकांचा एकमेकांवर विश्वास नाही तर, देशावर कसा विश्वास ठेवणार, असा सवाल मोदींनी केला.
काँग्रेस महागाई घेऊन येतो..
महागाई घेऊन काँग्रेस सत्तेवर येतो. महागाईमुळे लोकांच्या समस्या वाढल्याची कबुली नेहरूंनी वारंवार दिली होती. पंतप्रधान झाल्यावर १२ वर्षांनंतरही ते महागाईवर बोलत होते. इंदिरा गांधींही, देशाचा विकास होतो, तेव्हा महागाई होते, असे म्हणाल्या होत्या. त्यांच्या काळात महागाईचा दर ३० टक्के होता. ‘यूपीए’च्या काळातही दोन अंकी महागाई होती. काँग्रेसने महागाईला मजबूत केले होते पण, आम्ही महागाई नियंत्रणात ठेवली.
हेही वाचा >>>मनोरंजनाच्या बहुपर्यायांतही कथामाध्यम शाबूत..; हिंदी लेखक मनोज रुपडा यांचे मत
भ्रष्टाचार समूळ नष्ट करू!
भ्रष्टाचारी विरोधी नेत्यांवर कारवाई होत असल्याने ते संतापले आहेत, असे सांगत मोदींनी देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याची ग्वाही दिली. १० वर्षांपूर्वी संसदेत फक्त घोटाळय़ांवर चर्चा होत होती. कारवाईची मागणी केली जात होती, आज भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई होत आहे. ‘पीएमएलए’अंतर्गत दुप्पट गुन्हे दाखल केले. काँग्रेस काळात ‘ईडी’ने ५ हजार कोटी संपत्ती जप्त केली, आमच्या काळात १ लाख कोटी संपत्ती जप्त झाली. नोटाच्या नोटा जप्त होत असून देशवासीय आश्चर्यचकित झाले आहेत. आम्ही भ्रष्टाचाऱ्यांकडील जप्त पैसे गरिबांच्या कल्याणासाठी वापरले आहेत.
सैन्याचे खच्चीकरण खपून घेणार नाही
देश सुरक्षा व शांतता अनुभवत असून दहशतवाद, नक्षलवाद छोटय़ा भागांपुरता उरला आहे. सैन्यदलाच्या खच्चीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. पण, देश हे सहन करणार नाही. अनुच्छेद ३७० रद्द केले आहे. आज तिथे विकास होत आहे. काश्मीरचा प्रश्न नेहरूंमुळे निर्माण झाला असून त्यांच्या चुकांची किंमत देशाला चुकवावी लागली आहे. त्यांच्या चुका आम्ही सुधारत आहोत. त्या सुधारत राहू, आम्ही थांबणार नाही, असे मोदी म्हणाले.