पीटीआय, केवडिया (गुजरात)
‘‘देशाच्या विकासाच्या वाटचालीत ठरावीक वर्गाचे लांगूलचालन आणि तुष्टीकरणाचे राजकारण हा सर्वात मोठा अडथळा आहे. एक खूप मोठय़ा राजकीय वर्गाला सकारात्मक राजकारण अजिबात सुचतच नाही. ते आपल्या राजकीय स्वार्थासाठी देशाच्या एकात्मतेबाबतही तडजोड करू शकतात,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.
देशाचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून देशभर साजरी करण्यात आली. यानिमित्त गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील सरदार सरोवरलगतच्या सरदार पटेलांच्या एकात्मता स्मारकाला (स्टॅच्यू ऑफ युनिटी) पुष्पांजली अर्पण केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.मोदी म्हणाले, की आपल्याला भारताला एक समृद्ध आणि विकसित देश बनवायचा आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडून प्रेरणा घेऊन हे ध्येय साध्य करायचे आहे. आपल्या या विकासयात्रेत तुष्टीकरणाचे राजकारण हा सर्वात मोठा अडथळा आहे. देशातील गेली अनेक दशके माजलेला दहशवाद, त्याची भयावहता, क्रौर्य हे लांगूलचालन करणाऱ्या माणुसकीच्या शत्रूंना अजिबात दिसत नाही. देशाच्या शत्रूंसोबत बिनदिक्कतपणे हातमिळवणी करताना त्यांना अजिबात संकोच वाटत नाही.
हेही वाचा >>>व्यावसायिकाच्या १६ वर्षांच्या मुलाची हत्या, महिला शिक्षिकेच्या घरी आढळला मृतदेह
जेव्हा देशाला याबद्दल जाणीव जागृती होईल तेव्हाच आपण आपली विकासाची उद्दिष्टे साध्य करू, असे सांगून मोदी म्हणाले, की देशाची एकात्मता टिकवण्याचा प्रयत्न क्षणभरही सोडता कामा नये. एकतेचा मंत्र आपल्याला सातत्याने आचरणात आणायचा आहे. गेल्या नऊ वर्षांत देशांतर्गत सुरक्षेलाही अनेक आव्हाने निर्माण झाली. मात्र, सुरक्षा दलांनी अत्यंत सक्षमपणे आणि कठोरपणे त्यांचा बीमोड केला असे ते म्हणाले. देशवासीयांना नऊ वर्षांपूर्वी गर्दीच्या, वर्दळीच्या बाजारपेठेत, सार्वजनिक ठिकाणी आणि व्यावसायिक केंद्रात वावरताना धाकधूक वाटत असे असा दावा त्यांनी केला.
‘सरदार समाधानी असतील’
मोदींनी यावेळी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द केल्याचा उल्लेख केला. जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले अनुच्छेद ३७० हटवले जाऊन काश्मीरला स्वातंत्र्य मिळेल, असे कोणाला वाटले होते का? पण आज काश्मीर आणि देशामध्ये अनुच्छेद ३७० चा अडथळा दूर झाला आहे. सरदारसाहेब याबाबत खूप समाधानी असतील आणि आशीर्वाद देत असतील असा दावा त्यांनी केला.
देश सतर्क राहिला तरच विकासाची ध्येये गाठणे शक्य होईल.एका क्षणासाठीही देशाचे ऐक्य कायम राखण्याचे प्रयत्न सोडून देता कामा नयेत. आपल्याला सातत्याने ऐक्याचा मंत्र जपावा लागेल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान