G20 Summit Delhi 2023 : गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या राजधानीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी २० शिखर परिषद सुरू होती. जगभरातील अनेक नेते आणि विविध देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सामील झाले होते. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, दिल्ली जाहीरनामाही प्रसिद्ध झाला. आर्थिक, व्यावसायिक, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आदी मुद्द्यांवरून विविध देशांनी विचार आदान-प्रदान केले. दोन दिवस चाललेल्या बैठकीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समारोप केला आहे. तसंच, नोव्हेंबर २०२३ पर्यंत जी २० चं अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यानंतर, हे अध्यक्षपद दुसऱ्या देशाकडे देण्यात येणार आहे. त्याबाबतही मोदींनी मोठी घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जी २० च्या समारोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारताकडे नोव्हेंबरपर्यंत जी २० चं अध्यक्षपद आहे. यासाठी अडीच महिने बाकी आहेत. या दोन दिवसांत आपण सर्वांनी अनेक सूचना आणि प्रस्ताव मांडले आहेत. प्राप्त झालेल्या सुचनांवर आमच्याकडून विचार करण्यात येईल, ही आमची जबाबदारी आहे. नोव्हेंबरच्या शेवटी जी २० चं एक व्हर्चुअल सेशन ठेवलं जाईल. या सेशनमध्ये दोन दिवसीय शिबिरात झालेल्या मुद्द्यांची समिक्षा केली जाईल. तुम्ही या व्हर्च्युअल सत्रांत सहभागी व्हाल अशी आशा करतो. यासह, मी जी २० शिखर परिषदेचा समारोप घोषित करतो.”

जी २० चं पुढील अध्यक्षपद ब्राझिलकडे

ब्राझीलचे राष्ट्रपती आणि माझे मित्र लुला दा सिल्वा यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत जी २० च्या अध्यक्षपदाचं गेवल (प्रातिनिधिक चिन्ह) नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपतींकडे सुपूर्द केलं. म्हणजेच, नोव्हेंबर २०२३ नंतर जी २० चं अध्यक्षपद ब्राझिलकडे असणार आहे.

जी २० चं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लुला दा सिल्वा म्हणाले की, “ब्राझीलच्या अध्यक्षपदाची तीन प्राधान्ये आहेत, सामाजिक समावेश – उपासमार विरुद्ध लढा, ऊर्जा संक्रमण – शाश्वत विकास आणि जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा.”

शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी काय घडलं?

G20 Summit Delhi 2023 ‘ग्लोबल साऊथ’मधील विकसनशील देशांना सर्वाधिक फटका बसलेल्या युक्रेन युद्धाचा थेट उल्लेख असलेला ‘दिल्ली जाहीरनामा’ शनिवारी ‘जी-२०’ समूहाच्या शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी स्वीकारण्यात आले. युक्रेनच्या वादग्रस्त मुद्दय़ाचाही समावेश जाहीरनाम्यात झाल्याने भारताच्या राजनैतिक मुत्सद्दीपणाचे हे मोठे यश मानले जात आहे! ‘हा काळ युद्धाचा नाही’, असे ठळकपणे जाहिरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

करोना महासाथीमुळे जगभरातीत देशांना एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास कमी झाला आणि युक्रेन युद्धामुळे ही दरी वाढल्याचे जाणवते. करोनासारख्या आपत्तीवर आपण यशस्वीपणे मात केली असून अविश्वासाच्या या संकटावरही जग मात करू शकते. देशा-देशांमध्ये पुन्हा एकदा विश्वासाचे वातावरण निर्माण करून पुढे गेले पाहिजे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० समूहातील राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रातील भाषणाद्वारे दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi declared the conclusion of g 20 summit and handover the gavel to this country president sgk