भाजप आणि हिंदूत्ववादी संघटनांच्या नेत्यांकडून करण्यात येणाऱया वादग्रस्त वक्तव्यांवर भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे प्रचाराची दिशा विकासाच्या आणि सुप्रशासनाच्या मुद्द्यापासून भरकटते आहे, असे मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे. या नेत्यांनी केलेल्या कोणत्याही बेजबाबदार वक्तव्यांशी आपण सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया आणि भाजपचे नेते गिरिराजसिंह यांनी गेल्या दोन दिवसांत मुस्लिमविरोधी वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे भाजपपुढील अडचणी वाढल्या आहेत. मोदीविरोधकांनी पाकिस्तानात जावे, असे वक्तव्य गिरिराजसिंह यांनी केले. तर हिंदूंचे प्राबल्य असलेल्या वसाहतींमधून मुस्लिमांना हुसकावून लावावे, असे वक्तव्य प्रवीण तोगडिया यांनी केले. या दोन्ही वक्तव्यांवर मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. अशी वक्तव्ये करण्यापासून नेत्यांनी चार हात लांबच राहावे, असा सल्लाही मोदी यांनी दिला आहे.