पीटीआय, झंझारपूर (बिहार) : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले नाहीत, तर बिहारमधील सीमा भाग घुसखोरांनी भरला जाईल,’’असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिला. नेपाळ आणि बांगलादेशजवळ असलेल्या झांझारपूर लोकसभा मतदारसंघात एका सभेला संबोधित करताना शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांच्यावर सरकारी शाळांमधील सुट्टय़ा कमी करून, तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहा म्हणाले, की बिहारच्या सरकारने रक्षाबंधन, जन्माष्टमीसारख्या सणांच्या सुट्टय़ा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बिहारवासीयांनी विरोध करून राज्य सरकारला हा आदेश मागे घेण्यास भाग पाडले. त्याबद्दल मी बिहारच्या जनतेचे अभिनंदन करतो. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी आणि जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० मागे घेण्याचा निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. बिहारच्या सत्ताधारी आघाडीत काँग्रेस आहे. अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि अयोध्येत राम मंदिर पुढील वर्षी जानेवारीपर्यंत उभारले जात असल्याबद्दल शहा यांनी मोदींची प्रशंसा केली.

बिहारमध्ये सर्व जागा जिंकू

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बिहारमधील सर्व ४० लोकसभा जागा जिंकेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) वर ‘सनातन धर्मा’चा अपमान केल्याबद्दल टीका केली. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) हे पूर्वीचे नाव वगळले कारण या आघाडीचे नाव १२ लाख कोटी रुपयांच्या घोटाळय़ाशी जोडले गेले होते, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi doesnt win again the rule of intruders amit shah ysh