पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची धुरा सांभाळण्यास सुरूवात केल्यापासून ७२ तासांच्या आत १०० दिवसांचा प्लॅन जाहीर करुन उत्तम शासन देण्याचे मुख्य उद्दीष्ट असल्याचा स्पष्ट संदेश दिला. अभूतपूर्व मतदान करून देशाच्या नागरिकांनी १६ व्या लोकसभेची निवड केली आहे. आता सर्व नागरिकांच्या आशा-आकाक्षांची पूर्तता करण्यासाठी लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे वचनही मोदींनी दिले आहे. परंतु, गेल्या दहा दिवसांत वेगवेगळ्या कारणांसाठी मोदी सरकार चर्चेत आहे त्यातील दहा मुद्दे पुढीलप्रमाणे..
* कलम ३७०-
भारतीय पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप होते न होते तोवर राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी कलम ३७० रद्द करण्यासाठी आजवर सहमत न झालेल्यांना ‘सहमत करण्यासाठी’ सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली. यावर जम्मू -काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तसेच पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती संतप्त झाल्या. ओमर अब्दुल्ला यांनी यावर कडाडून टीका केली होती.
कलम ३७०, काश्मीर आणि आपण..
* पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट-
पंतप्रधान कार्यालयाचे ट्विटर अकाऊंट (@PMOIndia) डिलीट केल्याने वादंग निर्माण झाला होता. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना, पंतप्रधान कार्यालयाकडून ‘पीएमओ इंडिया’ ट्विटर अकाऊंट सुरू केले होते. ‘पीएमओ इंडिया’चे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. मात्र मनमोहन सिंह यांनी कार्यालय सोडताच, त्यांच्या टीमने हे ट्विटर अकाऊंट आगामी पंतप्रधानांकडे स्वाधीन न करता, ते सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बंद केले. मात्र पंतप्रधान कार्यालयाचे पीएमओ इंडिया हे ट्विटर हँडल, राष्ट्रीय संपत्ती असल्याचे म्हणत भाजपने त्यावर टीका केली होती. या वादानंतर पीएमओ इंडिया अकाऊंटला पीएमओ इंडिया आर्काइव्हमध्ये (@PMOIndiaArchive) बदलण्यात आले. त्यामुळे याचे फॉलोअर्सही नव्या अकाऊंटचे फॉलोअर्स बनले.
* स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेवरून वादंग-
मोदींच्या मंत्रिमंडळातील मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक ‘विस्मृती’वरून वाद निर्माण झाला होता.
स्मृती इराणी यांनी दिल्लीतील चांदनी चौक मतदारसंघातून २००४ मध्ये निवडणूक लढविताना दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्याकडे बीएची पदवी असल्याचे म्हटले होते. त्या वेळी निवडणूक अर्जातील रकाना भरताना इराणी यांनी आपण बीए, १९९६, दिल्ली विद्यापीठ (दूरस्थ विभाग) असे नमूद केले होते. मात्र २०१४ मध्ये निवडणूक अर्जातील रकाना भरताना इराणी यांनी बी.कॉम., प्रथम वर्ष, मुक्त शिक्षण विभाग, दिल्ली विद्यापीठ, १९९४ असे म्हटले होते.
* शिवसेनेचा मंत्रिपदावरून रुसवा-
लोकसभा निवडणुकीत १८ जागा जिंकूनही शिवसेनेत ‘अवजड’ जागेचे दुखणे झाले होते. अन्य सहकारी पक्षांच्या तुलनेत केंद्रीय मंत्रिमंडळात दुय्यम दर्जाचे खाते मिळाल्याने शिवसेना नाराज झाली होती. एकच मंत्रिपद मिळाल्याने आधीच खट्ट झालेल्या शिवसेनेच्या वाटय़ाला अवजड उद्योग मंत्रालय सोपवण्यात आल्याने नाराजी उघडपणे समोर आली होती. त्यानंतर शिवसेनेने नमते घेऊन गीते यांनी पदभार स्वीकारला.
* ‘स्कॉर्पियो’ ऐवजी ‘बीएमडब्लू’-
नरेंद्र मोदी नेहमी महेंद्रा या स्वदेशी कंपनीची स्कॉर्पियो गाडी प्रवासासाठी वापरत. स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी मोदींची प्रवासादरम्यान, ‘स्कॉर्पियो’लाच पसंती असे परंतु पंतप्रधान झाल्यानंतर मोदी स्कॉर्पियो वापरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. स्कॉर्पियोच वापरावी, यासाठी महेंद्रा कंपनीचाही मोदींशी पत्रव्यवहार सुरू होता परंतु, अखेर सुरक्षेच्या कारणास्तव मोदींना ‘स्कॉर्पियो’ला सोडचिठ्ठी देऊन विदेशी ‘बीएमडब्लू’ गाडी स्वीकारावी लागली.
* संजीव बलिया यांचा मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश केल्याने टीका-
मुझफ्फरनगरमधील दंगलींच्या वेळी देण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संजीव बलिया यांना केंद्रीय कृषीराज्यमंत्री पद बहाल करून मोदींच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करुन घेतल्याने टीका केली गेली. काँग्रेसने बलिया यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
* शालेय अभ्यासक्रमात मोदींचा धडा-
शालेय अभ्यासक्रमात मोदींच्या जीवनावर आधारीत धड्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्याचा विचार काही राज्यांकडून केला गेला. यावर मोदींनी विरोध दर्शवून माझा जीवनसंघर्ष शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करु नये अशी सुचना केली. जीवीत व्यक्तींचा जीवनपट शालेय अभ्याक्रमात समावेश करणे चुकीचे आहे. आपल्या देशाला अभूतपूर्व इतिहास लाभला आहे. यात अनेक महापुरुषांचे योगदान आहे त्यामुळे इतिहास घडविणाऱया अशा खऱया महापुरुषांची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे असे मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटले होते.
* यशवंत सिन्हा तुरूंगात-
एकीकडे नरेंद्र मोदी उत्तम शासन आणि विकासाच्या प्रयत्नांसाठी विचार करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा व तीनशे पक्ष कार्यकर्त्यांनी वीज पुरवठा खंडित झाल्याच्या कारणास्तव राज्य वीज मंडळ अधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे सिन्हा यांना भाजप कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आली. यशवंत सिन्हा यांना याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनाविण्यात आली.
* भाजप खासदाराच्या निवासस्थानी छापा-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व भाजपचे खासदार डॉ. सत्यपालसिंह यांनी भाडय़ाने दिलेल्या सदनिकेत देहविक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनैतिक व्यवहार प्रतिबंधक (पीटा) कायद्यान्वये कारवाई करणाऱ्या समाजसेवा शाखेने सदनिका ‘सील’ करणे मात्र टाळले. अशा प्रकरणात सरसकट सदनिका सील केली जाते. मात्र, माजी आयुक्तांची सदनिका अपवाद ठरली आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
* गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन-
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्ली विमानतळावर जाताना अपघाती निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुंडे यांच्या जाण्याने देशाला मोठा फटका बसल्याचेही म्हटले. मुंडे यांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता असल्याचे वर्तवत मुंडे यांच्या अंत्यसंस्काराला लोटलेल्या जनसागराने अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, अशा घोषणा केल्या आणि संतप्त कार्यकर्त्यांचा मंत्र्यांना घेराव घातला. या मागणीला काही मंत्र्यांनीही दुजोराही दिला आहे.
अंतर्गत रक्तस्रावामुळेच मुंडेंचे निधन – एम्स