९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपाला यावेळी बहुमताची संख्या गाठता आलेली नाही. भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत. एनडीएच्या साथीने ही संख्या २९४ इतकी झाली आहे. एनडीएचं सरकार देशात आहे आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. अशात लालूप्रसाद यादव यांनी ऑगस्ट महिन्यात सरकार कोसळणार असा दावा केला आहे.

काय म्हणाले लालूप्रसाद यादव?

राष्ट्रीय जनता दलाचा २८ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी लालूप्रसाद यादव यांनी उपस्थितांना संबोधित केलं. लोकसभा निवडणुकीत जी कामगिरी पक्षाने करुन दाखवली ती उत्तम आहे असं लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं. तसंच तेजस्वी यादव यांनीही यावेळी भाषण केलं. आपल्या भाषणात लालूप्रसाद यादव यांनी मोदी सरकार ऑगस्ट महिन्यात कोसळणार असा दावा केला आहे.

मोदी सरकारबाबत काय म्हणाले लालूप्रसाद यादव?

“केंद्रात बसलेलं मोदी सरकार हे कमकुवत आहे. मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यांत हे सरकार पडणार. तसंच येत्या काळात आपला पक्ष चांगली कामगिरी करणार याचाही मला विश्वास आहे.” असं लालू्प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनीही भाषण केलं.

तेजस्वी यादव काय म्हणाले?

तेजस्वी यादव यांनीही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना २८ व्या स्थापना दिवसाच्या दिवसाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तेजस्वी यादव म्हणाले, “आपला पक्ष सत्तेतही होता, सत्तेबाहेरही होता. पण विचारधारेशी आपण कधीही तडजोड केली नाही.आपण कायमच आपला संघर्ष सुरु ठेवला. आपल्याला कधी यश मिळालं कधी अपयश आलं पण आपले कार्यकर्ते कायमच पक्षनिष्ठेने काम करत राहिले.” असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- संसदेत सेंगोल नको, संविधान हवं; सपा खासदाराच्या मागणीनंतर विरोधक-सत्ताधाऱ्यांचं ‘महाभारत’

यावेळी राजद बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आपण आधी जनता दलाचा भाग होतो. पण त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला आणि आपण वेगळा मार्ग स्वीकारला. तसंच काही घटक पक्षही निर्माण झाले. मात्र आपण आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. राजदची मतं ९ टक्क्यांनी वाढली आहेत. तर एनडीएची मतं कमी झाली आहेत. असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

तेजस्वी यादव म्हणाले की भाजपा आरक्षण आणि संविधानाविरोधात

तेजस्वी यादव पुढे म्हणाले, जातीच्या आधारावर आरक्षण देण्यास आपण सुरुवात केली. मर्यादित वेळेत जातीच्या आधारे सर्वेक्षण केलं आणि आपलं वचन पूर्ण करुन दाखवलं. मात्र भाजपा आरक्षण आणि संविधानाच्या विरोधात आहे. बिहारमध्ये डबल इंजिन सरकार असल्याचा दावा करतात मात्र या सरकारने बांधलेले १२ पेक्षा जास्त पूल कोसळले आहेत. NEET पेपरफुटी प्रकरणही यांच्याच कार्यकाळात झाली आहे. गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. असाही आरोप तेजस्वी यादव यांनी केला.