भागलपूर (बिहार), : भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काही ठरावीक अब्जाधीश देशाच्या लोकशाहीला तसेच घटनेला धोका निर्माण करत आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. बिहारमधील भागलपूर येथील सभेत केंद्र सरकारवर टीका केली.
देशातील २२ व्यक्तींकडे संपत्तीचे केंद्रीकरण झाले असून, देशातील ७० कोटी लोकांना दिवसाला शंभर रुपयांवर गुजराण करावी लागते असा दावा राहुल यांनी केला. मोदी सरकारने २५ जणांची १६ लाख कोटींची कर्जे माफ केली असा आरोप राहुल यांनी केला.
शेतकऱ्यांचे कधी कर्जे माफ केले आहे काय? असा सवाल राहुल यांनी केला. संपत्तीचे गरिबांना योग्य वाटप व्हावे यासाठी इंडिया आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मूळ मुद्दयावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. सत्तेत आल्यावर बेरोजगारीची समस्या काँग्रेस सोडवेल असे आश्वासन त्यांनी दिले.
हेही वाचा >>> नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
मोदींकडून भ्रष्टाचाराच्या शाळेचे संचालन
निवडणूक रोख्यांच्या मुद्दयांवर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर समाजमाध्यमातून टीका केली. मोदी हे भ्रष्टाचाराची शाळा चालवत असून, भ्रष्टाचार विज्ञानाचे धडे देत आहेत असा टोला राहुल यांनी लगावला. त्यांच्याकडे धुलाई यंत्र असून, केंद्रीय संस्थांचे रूपांतर वसुली एजंटांमध्ये करण्यात आले असून, जामीन तसेच तुरुंगवासाचा खेळ यातून खेळला जातो असा आरोप त्यांनी केला.