राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर लोकसभेत आज चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यानिमित्ताने आज पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी त्यांच्या भाषणात सत्ताधाऱ्यांनी वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही संविधानावर हल्ल्याबाबत बोलल्यानंतर भाजपाकडून आता वारंवार संविधानाचा उल्लेख केला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच अयोध्येचा उल्लेख करताना ते म्हणाले की, जर पंतप्रधान मोदी अयोध्येतून निवडणुकीला उभे राहिले असते तर ते तिथून पराभूत झाले असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाने हिंदुत्त्वाच्या नावावर देशात भीतीचे वातावरण पसरवले आहे, असा आरोप करत राहुल गांधी यांनी याची सुरुवात अयोध्यापासून झाल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या बाजूलाच बसलेल्या फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद यांच्याशी हात मिळविला. अवधेश प्रसाद यांनीही उभे राहून सभागृहाला हात जोडले. “अयोध्याने भाजपाला संदेश दिला आहे. रामभक्तांनी भाजपाला संदेश दिला आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हणताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर आक्षेप घेत भाषणादरम्यान हस्तांदोलन करणे योग्य नसल्याचे म्हटले.

Parliament Session 2024 LIVE Updates : राहुल गांधींच्या वक्तव्याने लोकसभेत सत्ताधाऱ्यांचा गदारोळ

विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढे म्हणाले, भाजपाने राम मंदिराचे उदघाटन केले. मी अवधेश प्रसाद यांना विचारले की, तुम्हाला कधी कळले की, तुम्ही अयोध्येत जिंकू शकतात. ते म्हणाले, मला पहिल्या दिवसापासून माहीत होते की, मीच जिंकणार. अयोध्येत विमानतळ बनविण्यासाठी अयोध्यावासियांची जमीन हिसकावली गेली. आजपर्यंत त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. अयोध्येतील छोटे छोटे दुकानदार, छोट्या इमारतींना पाडण्यात आले. त्यांना रस्त्यावर आणले गेले. राम मंदिर उदघाटनाला उद्योगपती अदाणी, अंबानींना बोलविण्यात आले. मात्र अयोध्यामधील कुणीही नव्हते.

तर नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित होता

“अयोध्यावासियांच्या मनात नरेंद्र मोदी यांनी भय निर्माण केले. त्यांची जमीन घेतली. त्यांचे घर पाडले. त्यानंतर सामान्य अयोध्यावासियांना मंदिर उदघाटनावेळी दूर ठेवले. यामुळेच अयोध्येच्या जनतेने निवडणुकीत याचा वचपा काढला. तसेच नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा अयोध्यातून निवडणूक लढविण्यासाठी सर्व्हे केला. दोन्ही वेळा सर्व्हे करणाऱ्यांनी त्यांना अयोध्येतून निवडणूक लढविण्यास विरोध केला. जर ते तिथून लढले असते तर त्यांचा पराभव झाला असता. म्हणूनच पंतप्रधान वाराणसीत गेले आणि त्यांचा तिथे निसटता विजय झाला”, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांनी हिंदू धर्माबाबत बोलत असताना भगवान शिव यांचा फोटो दाखविला. मात्र त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेत नियमांचा हवाला दिला. भगवान शिव यांचा फोटोही आता सभागृहात दाखविणे चूक आहे का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. भगवान शिव यांनी आमचे रक्षण केले, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi had fought from ayodhya he would have definitely lost rahul gandhi criticized in his first speech kvg