पीटीआय, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी<strong> गुरुवारी श्रीनगरमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर मोदींचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे. यावेळी मोदी एका जाहीर सभेलाही संबोधित करतील.

मोदी श्रीनगरमधील बक्षी क्रीडा संकुलात ‘विकसित भारत, विकसित जम्मू कश्मीर’ कार्यक्रमास उपस्थित राहतील. मोदी यावेळी जम्मू-काश्मीरच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे पाच हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. या संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले, की या पार्श्वभूमीवर बक्षी क्रीडासंकुलात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने आणि विरोधी पक्षांनी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची आग्रही मागणी केल्याने पंतप्रधान या मुद्द्यांवर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>>“भाषण करताना भान बाळगा आणि…”, पंतप्रधान मोदींबाबत ‘ते’ शब्द वापरल्याने निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना सल्ला

५ ऑगस्ट २०१९ रोजी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या राज्याला अनुच्छेद ३७० नुसार देण्यात आलेल्या विशेषाधिकारांतील बहुतांश तरतुदी रद्द करून, राज्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले.

(पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगर येथे भेट देणार असल्याने शहरात सर्वत्र भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत.)