राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चेदरम्यान लोकसभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली.  राहुल गांधींनी महादेव, प्रेषित मोहम्मद, येशू ख्रिास्त, गुरू नानक अशा विविध धर्मांतील प्रेषित, धर्मगुरू व महापुरुषांची चित्रे असलेले फलक आणले होते. ‘या महापुरुषांनी घाबरू नका, दुसऱ्याला भीती दाखवू नका, अशी शिकवण दिली होती. मात्र, भाजप देशभर अल्पसंख्याकांविरोधात हिंसेला प्रोत्साहन देत आहे’, असा आरोप करताना भाजपमध्येही भयाचे वातावरण असल्याचा दावा केला.  स्वत:ला हिंदू म्हणविणारे भाजपवाले हिंसा आणि द्वेष पसरवित आहेत, ते हिंदू असूच शकत नाहीत, असंही राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.

“मी अत्यंत गंभीर विषयावर तुमचं आणि देशाचं लक्ष वेधू इच्छितो. काल जे झालं ते देशातील कोटी कोटी नागरिक येणाऱ्या काळात माफ करणार नाही. १३१ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये म्हटलं होतं की मला अभिमान आहे की मी त्या धर्मातून येतो जिथून पूर्ण जगाला सहिष्णूता आणि वैश्विक स्वीकृती स्वीकारली आहे. हिंदू सहनशील आहे. यामुळे भारताची लोकशाही, भारताची विविधता, वैविध्याची विराटता पाहू शकतोय. आज हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचं षडयंत्र रचलं जातंय”, असं मोदी लोकसभेत म्हणाले.

हेही वाचा >> लोकसभेत धुमश्चक्री; राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

“हिंदू हिंसक असतात, असं ते म्हणाले. पण हेच का तुमचे संस्कार? हे आहे का तुमचं चरित्र? हेच का तुमचे विचार? हा देश कधीच विसरू शकणार नाही. काही दिवसांपूर्वी तुम्ही हिंदूंमधील शक्तीची कल्पना मांडली होती, आता कोणत्या शक्तीच्या विनाशाबाबत तुम्ही बोलत आहात?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“हे तेच लोक आहेत ज्यांनी हिंदू आतंकवाद शब्दाची सुरुवात केली. यांनीच हिंदू धर्माची तुलना डेंग्यु, मलेरियाबरोबर करत असताना टाळ्या पिटल्या होत्या. हा देश यांना कधीही माफ नाही करणार. ही एक ठरवून केलेल्या रणनीती आहे. हिंदू परंपरा, हिंदू समाज, देशाची संपत्ती, देशाची विरासत यांना कमीपणा दाखवण्यात, शिव्या देण्यात, त्यांना अपमानित करण्यात, हिंदूची खिल्ली उडवण्याची फॅशन यांच्या इकोसिस्टिममध्ये आहे.. राजकीय स्वार्थासाठी हे केलं जातंय”, असंही मोदी म्हणाले.

हेही वाचा >> पंतप्रधानांचं भाषण अन् विरोधकांचा गोंधळ, लोकसभेतील ‘या’ दृष्यांमुळे अध्यक्ष राहुल गांधींवर संतापले!

राजकीय स्वार्थासाठी देवाच्या रुपांचा खेळ केला

“आम्ही लहानपणापासून शिकत आलो आहोत की गाव, शहर, गरीब, श्रीमंत अशा प्रत्येक मुलाला हे माहितेय की ईश्वराचं प्रत्येक रूप दर्शनासाठी असतं. देवाचं कोणतंही रुप स्वार्थासाठी, प्रदर्शनासाठी नसतं. ज्याचं दर्शन करतात, त्यांचं प्रदर्शन करत नाहीत. आमच्या देवी देवतांचा अपमान देशातील १४० कोटी जनतेच्या हृदयाला ठेच पोहोचवत आहेत. राजकीय स्वार्थासाठी देवाच्या रुपांचा अशाप्रकारे खेळ केला गेला”, अशीही टीका त्यांनी केली.

“कालच्या दृष्यांना पाहून आता हिंदू समाजालाही विचार करावा लागेल की हे अपमानजनक वक्तव्य आहे, योगायोग आहे की कोणत्या प्रयोगाची तयारी आहे याचा हिंदू समाजाला विचार करावा लागेल”, असं सूचक विधानही त्यांनी केलं.