अपेक्षेनुसार गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, तसेच त्यांचे विश्वासू सहकारी अमित शाह यांच्यासह नेहरू-गांधी घराण्याचे वारस वरुण गांधी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार मानले जाणारे मोदी यांचा भाजपच्या सर्वशक्तीमान केंद्रीय संसदीय मंडळात समावेश करण्यात आला आहे, तर अमित शाह आणि वरुण गांधी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या पूनम महाजन यांच्या माध्यमातून प्रमोद महाजन यांचा वारसा सात वर्षांंच्या खंडानंतर भाजपमध्ये पुनस्र्थापित झाला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या बहुप्रतिक्षित राष्ट्रीय कार्यकारिणीची येथे रविवारी सकाळी घोषणा करण्यात आली. तब्बल सहा वर्षांंनंतर मोदी यांचे राष्ट्रीय राजकारणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुनरागमन झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभा निवडणूक लढण्याच्या शक्यतेला त्यामुळे आणखीच बळ मिळाले आहे. केंद्रीय संसदीय मंडळात स्थान मिळविणारे मोदी हे भाजपचे एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत. मोदी समर्थक अमित शाह, बलबीर पूंज, डॉ. सी. पी. ठाकूर, स्मृती इराणी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मीनाक्षी लेखी यांना पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.उत्तर प्रदेशात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शह देण्यासाठी भाजपने वरुण गांधी यांना सरचिटणीसपदाची बढती दिली आहे. तीन वर्षांंपासून भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष असलेल्या पूनम महाजन यांना राष्ट्रीय सचिव म्हणून बढती देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांचा समावेश करून पक्षात त्यांचे महत्त्व अबाधित राखण्यात आले आहे. शिवाय केंद्रीय निवडणूक समितीत गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांना स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून गडकरी, मुंडे आणि महाजन यांच्याव्यतिरिक्त पक्षप्रवक्तेपदी प्रकाश जावडेकर, कोषाध्यक्षपदी पीयुष गोयल, संयुक्त सरचिटणीसपदी व्ही. सतीश आणि सचिवपदी श्याम जाजू यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
‘भाजपला उद्ध्वस्त करणारी कार्यकारिणी’
मात्र, राजनाथ सिंह यांची नवी कार्यकारिणी भाजपला उद्ध्वस्त करेल, असा दावा केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी केला. येणाऱ्या दिवसात मोदी आणि भाजप यांच्यातच संघर्ष पेटेल, असेही ते म्हणाले. भाजप नेहमीच नैतिकतेच्या गोष्टी करते. पण ज्या व्यक्तीविरुद्ध गंभीर आरोप आहेत आणि खटले सुरु आहेत, अशा कलंकित व्यक्तीला सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवून भाजप जनतेपुढे जाऊ शकणार नाही, अशी टीका त्यांनी अमित शाह यांच्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना केली. आपण लहान नेत्यांविषयी टिप्पणी करीत नाही, असे सांगून त्यांनी वरुण गांधींच्या नियुक्तीवर बोलण्याचे मात्र टाळले.

Story img Loader