आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे कधी आणि कोणती जबाबदारी सोपविणार, याचीच चर्चा शनिवारी येथे भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत सुरू होती. पण पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची माळ मोदींच्या गळ्यात पडणार काय, याचा निर्णय भाजप संसदीय मंडळातच घेतला जाईल, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजनाथसिंह यांची निवड झाल्यानंतर पक्षाची राष्ट्रीय परिषद प्रथमच होत आहे. या परिषदेत खुद्द राजनाथसिंह यांनीच मोदींचा जयजयकार करण्यात पुढाकार घेतला. त्यांनी मोदींचे हार घालून स्वागत केले आणि तालकतोरा स्टेडियममध्ये उपस्थित हजारो नेते व कार्यकर्त्यांना गुजरातमध्ये विजयाची हॅट्ट्रिक नोंदविणाऱ्या मोदींचे उभे राहून टाळ्या वाजवून अभिवादन करण्यासाठी आवाहन केले. मोदीसमर्थकांनी ‘नरेंद्र मोदीजिंदाबाद’ आणि ‘मोदी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं,’ अशा घोषणा देत वातावरण मोदीमय करून टाकले.
गुजरातमध्ये मोदींनी साधलेला विकास आणि सुशासनाची जगभर प्रशंसा होत असल्याचे सांगत राजनाथ सिंह यांनी त्यांची भरभरून स्तुती केली. देशापुढची आव्हाने अवघड आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला मार्गदर्शन करण्याची क्षमता फक्त अडवाणी यांच्याकडे आहे, असे त्यांनी नमूद केले. देशातील स्थिती, विद्यमान राजकीय परिस्थिती, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा व त्यापाठोपाठच्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या रणनीतीवर या परिषदेत चर्चा करण्यात येत आहे. राजनाथ सिंह यांना भाजपचे सर्वशक्तिमान संसदीय मंडळ तसेच केंद्रीय निवडणूक समितीची निवड करण्याचे अधिकार या परिषदेत दिले जातील.
तालकतोरा स्टेडियमबाहेर लागलेल्या भाजपच्या अधिकृत होर्डिग्ज, पोस्टर्स आणि बॅनर्सवर मोदींचे छायाचित्र नसल्यामुळे मोदीसमर्थक नाराज झाले होते. मात्र, पक्षाच्या अधिकृत बॅनर्सवर कोणत्याही मुख्यमंत्र्याचे छायाचित्र लागलेले नाही, याकडे मुख्यालयातील नेते लक्ष वेधत होते. मोदींच्या समर्थनार्थ गुजरातमधून आलेले अनेक कार्यकर्ते ‘मोदी लाओ, देश बचाओ’च फलक हातात घेऊन घोषणा देत होते.
निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद दिले जाणार?
भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद मोदींकडे सोपविले जाण्याची शक्यता असली तरी त्याची घोषणा लगेच होण्याची चिन्हे नाहीत. सूत्रांच्या मते कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही जबाबदारी स्वीकारण्याची मोदींची तयारी असल्यास ही घोषणा मार्चअखेर होऊ शकते. याशिवाय अकरा सदस्यांच्या संसदीय मंडळात मोदींचा समावेश होण्याचीही शक्यता आहे.

Story img Loader