सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे. ईडीने आज सकाळी सातच्या सुमारास संजय सिंह यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. सलग दहा तास चौकशी केल्यानंतर ईडीने संजय सिंह यांना अटक केली आहे. या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केरीवाल यांनी बुधवारी संजय सिंह यांच्या निवासस्थानी भेट दिली.
अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभा खासदार संजय सिंह यांचे वडील, त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात भ्रष्ट व्यक्ती आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.
हेही वाचा- “…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य
यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले, “आम आदमी पार्टी ही एक कट्टर प्रामाणिक पार्टी आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रामाणिकपणाचा रस्ता खूप कठीण असतो. आज आम्ही या लोकांसारखं (भाजपा) बेईमान झालो तर आमच्या सर्व समस्या संपतील. आम्ही कट्टर ईमानदार आहोत. यामुळेच आम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे. हेच यांचं मोठं दु:ख आहे. हे डोक्यापासून पायापर्यंत भ्रष्टाचारी आहेत. त्यांना आमच्या ईमानदारीचा विरोध करता येत नाहीये.”
हेही वाचा- आप खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक, मद्य घोटाळ्याप्रकरणी १० तासांच्या चौकशीनंतर कारवाई
“दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत एक हजाराहून अधिक छापे मारले. अनेक लोकांना अटक केलं. हा १०० कोटींचा घोटाळा असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो, मात्र एवढी छापेमारी करूनही त्यांना एक पैसाही सापडला नाही. ना जमिनीचे दस्तावेज सापडले, ना सोन्या-चांदीचे दागिने मिळाले. मागील एक वर्षात यांना काहीच मिळालं नाही. तरीही ते जबरदस्तीने लोकांना अटक करत आहेत”, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.
केजरीवाल पुढे म्हणाले, “आज यांनी संजय सिंह यांना अटक केली आहे. संजय सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचाराविरोधचा सर्वात बुलंद आवाज आहेत. नरेंद्र मोदी डोक्यापासून पायापर्यंत भ्रष्टाचारात बुडाले आहेत. स्वातंत्र भारताचे सर्वात भ्रष्टाचारी पंतप्रधान कुणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. उद्या यांचं सरकार गेलं आणि त्यांच्या कारभाराची चौकशी झाली, तर लक्षात येईल यांनी किती भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात संसदेत आणि संसदेबाहेर सर्वात बुलंद आवाज संजय सिंह होते. हे मोदींना बघवलं नाही. त्यामुळे त्यांनी आधी संजय सिंह यांना संसदेतून निलंबित केलं आणि आज खोट्या प्रकरणात अटक केली.”