काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे महत्त्वाच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प राहिले आहेत, मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी जनतेच्या नेत्याप्रमाणे नेहमीच महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडतात, असे भाजपने म्हटले आहे.
वयाच्या ६३व्या वर्षी मोदी देशातील युवापिढीचे नेते आहेत, कारण त्यांची विचारसरणी आणि ते ज्या पद्धतीने प्रतिसाद देतात त्यामुळे युवक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत, असे भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
मोदी यांनी अलीकडेच घटनेतील कलम ३७०चा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावरून प्रत्येक जण चर्चा करू लागला, मात्र राहुल गांधी यांना याबाबत चर्चा करताना कोणीही पाहिले नाही.
मोदी यांना जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव असून ते सातत्याने त्याला प्रतिसाद देतात आणि त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने जनतेचे नेते आहेत, असेही ठाकूर म्हणाले. केंद्रीय मंत्री आरपीएन सिंग यांनी अनुराग ठाकूर यांच्या मताला ठाम विरोध दर्शविला आहे. राहुल गांधी मोदी यांच्यापेक्षा देशभर दौरे करतात, दूरदर्शन अथवा सोशल मीडियाचा वापर करण्याऐवजी राहुल गांधी जनतेशी थेट संवाद साधतात, असे सिंग म्हणाले.

Story img Loader