स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्जमाफी, 1984 दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अमरिंदर सिंह यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिलं आहे की, गेल्या पाच वर्षांत आपण दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण करण्यात आलेलं एक आश्वासन सांगावं. मोदींनी गुरुदासपूर येथे घेतलेल्या प्रचारसभेचा उल्लेख करताना ते बोलले की, ‘नरेंद्र मोदी यांनी जुमले मारत तसंच धोका देत आणि मनाच्या गोष्टी सांगत देशाची पातळी खालावली आहे. लोकांनाही आपलं भलं व्हावं असं वाटत असल्यानेच त्यांना सत्तेवरुन हटवण्याच्या तयारीत आहेत’.
नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने निवडून द्या सांगत लोकांना सामोरं जाणार आहेत असाच प्रत्येकजण विचार करतोय असं अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचं म्हटलं. गुरुदासपूर येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की, ‘देशातील इतर राज्यांप्रमाणे काँग्रेसने पंजाबमध्येही कर्जमाफीची घोषणा केली होती. पण दीड वर्षांनी काय परिस्थिती आहे सर्वांनाच माहित आहे. काँग्रेसने भूतकाळात अशा लोकांचं कर्ज माफ केलं होतं जे शेतकरीच नव्हते. काँग्रेसने गरिबी हटवण्याच्या नावे अनेक दशकं देशाला लुटलं आणि आता कर्जमाफीच्या नावे तेच करत आहेत’.