Narendra Modi Kolhapur Memorial Poland Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पोलंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी पोलंडमधील भारतीय नागरिकांशी संवाद साधला. तसेच राजधानी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला भेट दिली. मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या दौऱ्याचे अपडेट्स दिले आहेत. मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की “आज मी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात कोल्हापूरचं राजघराणं आघाडीवर होतं”.
मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य देत पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाने जगता येईल याकडे लक्ष दिलं. करुणेची ही भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील”.
दरम्यान, वॉर्सा येथील भारतीय नागरिकांना संबोधित करताना मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक हे महाराष्ट्रातील नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीप्रती पोलंडच्या नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे. मराठी संस्कृतीत मानवधर्म व आचरणाला सर्वाधिक प्राधान्य दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापूरच्या राजघराण्याने पोलंडमधील महिला व मुलांना शरण दिली होती. त्यांच्यासाठी कोल्हापूरमधील वळिवडे येथे एक मोठी वसाहत उभी केली होती. पोलिश महिला व मुलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी दिवसरात्र एक केली होता. महाराष्ट्राच्या त्याच मदतीला पोलंडने सलाम केला आहे.
हे ही वाचा >> Suresh Gopi : “…अन् अमित शाहांनी हातातले कागद फेकून दिले”, भाजपाच्या मंत्र्याने सांगितला तो प्रसंग
पोलंडचं कोल्हापूर कनेक्शन
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक पोलंडवासियांना देश सोडून विस्थापित व्हावं लागलं होतं. त्याचदरम्यान, भारतात आलेल्या जवळपास २३०० पोलंडवासियांना कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी आश्रय दिला होता. त्यांच्यासाठी वळिवडे येथे मोठी वसाहत उभी केली होती. राहण्यासाठी खोल्या तसेच छोटं चर्चही बांधलं होतं. परिस्थिती निवळल्यानंतर पाच-सहा वर्षांनी हे पोलंडवासी मायदेशी परतले. मात्र कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने केलेली मदत पोलंडवासी विसरले नाहीत. छत्रपती घराण्याच्या सन्मानार्थ त्यांनी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे कोल्हापूर स्मारक उभारलं. काही वर्षापूर्वी पोलंडने कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील संभाजीराजे छत्रपती यांना पोलंडला विशेष अतिथी म्हणून बोलावलं होतं. पोलंडने संभाजीराजेंचा सन्मानही केला होता.