पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धक्कातंत्र साधणाऱ्या लाहोर भेटीनंतर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मोदी यांच्या या अनौपचारिक मुत्सद्देगिरीमुळे भाजपमधील कडव्या हिंदुत्ववादी नेत्यांची बोलती बंद झाली. राज्यसभा खसदार विनय कटीयार, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. सीमेवर जवान शहीद होत असताना मोदींचा पाकिस्तान दौरा व्यथित करणारा असल्याची प्रतिक्रिया जदयू नेते के. सी. त्यागी यांनी व्यक्त केली. मोदींच्या पूर्वनियोजित नसलेल्या या दौऱ्यानंतर भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत निदर्शन केली.
मोदींनी आतंरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा विनोद चालविला आहे. अशा प्रकारे कुणा राष्ट्रप्रमुखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोण जाते? गेल्या ६७ वर्षांत देशाचा एकाही पंतप्रधानांनी असा बेजबाबदार दौरा केला नव्हता, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली.
जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांनी मोदींच्या दौऱ्याचे स्वागत केले आहे. कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीरवाईज उमर फारुख यांनी मोदींच्या दौऱ्यास सकारात्मक ठरविले. तर सय्यद अली शाह गिलानी यांनी दोन्ही देशांचे संबंध या दौऱ्यामुळे सुधारणार असतील तर आमची हरकत नसल्याची सावध प्रतिक्रिया दिली.
मोदींच्या वाजपेयींना शुभेच्छा
नवी दिल्ली : परदेश दौऱ्यावरून परतलेल्या मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी विमानतळावरून थेट वाजपेयी यांच्या ६ए, कृष्ण मेनन मार्गावरील घरी गेले. ९१व्या वर्षांत पदार्पण केलेल्या वाजपेयी यांनी निर्णायक काळात देशाचे नेतृत्व केले. अशा महान व्यक्तीला नमन करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, अशा आशयाचे ट्वीट मोदी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा