अणु, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये रशियासोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने ब्राझीलमध्ये असलेल्या मोदी यांनी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांनी पुतीन यांना कुडानकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्पाला भेट देण्याचेही निमंत्रण दिले. येत्या डिसेंबरमध्ये पुतीन भारतात येणार आहेत. त्यावेळी ते कुडानकुलमला भेट देण्याची शक्यता आहे.
मोदी आणि पुतीन या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४० मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली. दोन्ही नेते पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सोमवारीच भेटणार होते. मात्र, पुतीन ब्राझिलियामध्ये काही भेटीगाठींमध्ये व्यस्त असल्याने ही भेट मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. भेटीच्या सुरुवातीलाच पुतीन यांनी लोकसभा निवडणुकीत मोदींनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले. भारत आणि रशियातील मैत्रीसंबंध स्वातंत्र्य मिळण्याआधीपासून आहेत. विविध कठीण समस्यांच्यावेळीही या दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध कायम राहिले असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
भारतातील एखाद्या लहान मुलाला जरी विचारले की भारताचा मित्र कोण तर तो रशियाचेच नाव घेईल. इतके दोन्ही देशांमधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. हेच संबंध भविष्यात आणखी दृढ करायचे असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

Story img Loader