भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर आज (शुक्रवारी) शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी संध्याकाळी मोदी यांच्या नावाची घोषणा केली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांचे नाव निश्चित करण्यात आले.
‘रागावलेल्या’ अडवाणींचे राजनाथ यांना पत्र; कार्यपध्दतीवर टीका
आज संध्याकाळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विशेष विमानाने भाजपच्या दिल्ली येथील कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास राजनाथ सिंह यांनी मोदी यांच्या नावाची पक्षाकडून अधिकृतपणे घोषणा केली. त्यावेळी भाजपचे प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते. मोदी यांच्या नावाची घोषणा होताना लालकृष्ण अडवाणी यांनी मात्र अनुपस्थित राहणेच पसंत केले. यावरूनच भाजपमधील पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहेत.
व्हिडिओ : भाजप कार्यकर्त्यांचा मुंबईत जल्लोष
 
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने माझ्यासारख्या एका सामान्य परिवारातून आलेल्या छोट्या कार्यकर्त्याला खूप मोठ्या पदासाठी निवडल्याबद्दल मोदी यांनी सर्वांचे आभार मानले. मोदी यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी अधिकृत घोषणा झाल्यानंतर ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे चिन्ह ‘कमळ’ एक नवीन विचार घेऊन या निवडणुकीत उतरेल असंही ते पुढे म्हणाले.