पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षेसंदर्भातील मोठी चूक झाल्याने मोदींची सभा रद्द करण्यात आलीय. मोदींचा ताफा अडवल्याने त्यांची सभाच रद्द करावी लागली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षेमधील या गोंधळासंदर्भात पंजाबमधील काँग्रेस सरकारकडून अहवाल मागवला आहे. मात्र त्याचवेळी काँग्रेसच्या समर्थकांकडून आता मोदींच्या सभेला गर्दीच नसल्याने सुरक्षेचं कारण देऊन सभा रद्द करण्यात आल्याचा दावा सोशल नेटवर्किंगवरुन केला जातोय.
पंतप्रधान मोदींच्या या सभेच्या आधीच आज पंजाबमध्ये पाऊस सुरु झाला. पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे हवाई मार्गाने जाण्याच्या नियोजित कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला. भटिंडामध्ये पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. मात्र त्यांचा ताफा हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावरील फ्लायओव्हरवर अडवण्यात आला.
दुसरीकडे मोदींच्या सभेच्या ठिकाणी पाऊस पडू लागल्याने अनेकांनी खुर्चा, बॅनर्स आणि इतर प्रचार साहित्य डोक्यावर धरुन पावसापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सभेला हजारो लोक उपस्थित राहतील अशापद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं. हजारो खुर्चा या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या. या खुर्चांचा वापर अनेकांनी पाऊस पडाला लागल्यानंतर आसरा घेण्यासाठी केला.
याच पावसाचा आणि त्यामुळे सभेच्या ठिकाणी उडालेल्या गोंधळाचा व्हिडीओ युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बि. व्ही. यांनी ट्विटरवरुन शेअर केलाय. पंतप्रधान मोदींच्या हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाच्या ठिकाणी होणाऱ्यासभेमधील हा व्हिडीओ शेअर करत श्रीनिवास यांनी मोदींवर निशाणा साधलाय.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: फ्लायओव्हरवर अडकलेला ताफा, कारमध्ये बसलेले PM मोदी, सुरक्षारक्षकांचा वेढा अन्…; पाहा नक्की काय घडलं
श्रीनिवास यांनी, “कथित सुरक्षेमधील चूक” या कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये सभेच्या ठिकाणी पाऊस पडत असल्याचं दिसत आहे. मात्र त्याचबरोबर सभेसाठी मंचासमोर मांडण्यात आलेल्या खुर्च्या रिकाम्याच दिसताय. सभेच्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्यांच्या रांगांमध्ये उभं राहून हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचं दिसतेय. हा व्हिडीओ आधी मैदानाच्या मागील बाजूस आणि नंतर मंचाकडे पॅन होऊन सभेसाठी मैदानामध्ये गर्दी नसल्याचं दर्शवत आहे. या व्हिडीओमधून श्रीनिवास यांना सुरक्षेत चूक झाली म्हणून नाही तर रिकाम्या खुर्चांमुळे पंतप्रधानांनी सभा रद्द केली, असं सूचित करण्याचा प्रयत्न केलाय.
दरम्यान, आता काँग्रेसकडून सभेला गर्दी नसल्याचा दावा केला जात असतानाच दुसरीकडे भाजपाकडून पंतप्रधान मोदींच्या सभेला घाबरुन त्यांच्या कार्यक्रमामध्ये पंजाब सरकारने व्यत्यय आणल्याचा आरोप केला जातोय. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी असाच आरोप ट्विटरवरुन केलाय.,