केरळमधील कोल्लम येथील मंदिरातील दुर्घटनेनंतर काही तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देण्यास केरळचे पोलीस महासंचालकांनी विरोध दर्शवला होता. त्यापाठोपाठ आता आरोग्यसेवा संचालक आर. रमेश यांनीही पंतप्रधान मोदींसह काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजलेल्या व्यक्तींच्या अतिदक्षता विभागाला भेट देण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे अशा भेटी रोखण्यासाठी नियमांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
रविवारी दुर्घटनेनंतर मोदी व राहुल यांनी थिरुअनंतपुरम येथील वैद्यकीय महाविद्यालयातील स्वतंत्रपणे अतिदक्षता विभागाला भेट दिली होती. त्याच वेळी सात ते आठ रुग्ण अत्यवस्थ होते असे रमेश यांनी स्पष्ट केले. जळालेले मृतदेह, गंभीर जखमी रुग्णालयात असताना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची भेट गरजेची नाही असे त्यांनी सांगितले. दोन ते तीन दिवसांनी अशी भेट देण्यास आमचा आक्षेप नाही, मात्र रुग्णांच्या दृष्टीने दुर्घटनेनंतरचे काही तास महत्त्वाचे असतात, अशा वेळी केवळ मोदी व राहुल यांनीच अतिदक्षता विभागात प्रवेश केला नाही तर त्यांच्याबरोबर असलेले छायाचित्रकार व इतर व्यक्तीही आल्या. त्याला मी विरोध केला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, असे रमेश यांनी उद्विग्नपणे सांगितले. मोदींच्या सुरक्षा पथकाने शस्त्रक्रिया कक्षात जाण्यापासून रोखल्याचे एका परिचारिकेने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. अतिदक्षता विभागात एका रुग्णाची प्रकृती बिघडली मात्र तीस मिनिटे उपचारासाठी थांबावे लागल्याचे परिचारिकेने स्पष्ट केले. तर राहुल गांधी यांच्या भेटीवेळी त्यांच्या सोबतच्या सुरक्षारक्षकांनी अर्धा तास रोखून धरल्याचे एका डॉक्टरने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा