ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी कॉंग्रेसकडे कोणतीही ठोस योजना नाही, असे सांगून मोदी यांनी नीडोची हत्या म्हणजे राष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब  असल्याचे म्हटले आहे. ईशान्य भारताच्या दुर्दशेला केंद्र सरकारच जबाबदार असल्याची घणाघाती टीका करत नरेंद्र मोदींनी ईशान्य भारतामध्ये निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली.
इंफाळ येथे रॅलीला संबोधित करताना मोदींनी नीडोसाठी प्रार्थना केली. ते म्हणाले की,  केंद्र सरकारच्या योजना सगळ्या अपयशी ठरल्या असून राज्यकर्त्यांनी केवळ जनतेला लुटले आहे. तसेच वीज व पाण्यासारख्या व रोजगाराच्या समस्या न सोडवणा-या केंद्र सरकारने फोडा व राज्य करा असे धोरण राबवत त्याला ईशान्य भारत बळी पडल्याचे ते म्हणाले.
ईशान्य भारतातल्या आठ राज्यातल्या सगळ्या सरकारांना आपण सांगितले की दोन वर्षांसाठी प्रत्येकी २०० महिला पोलीस गुजरातमध्ये पाठवा. इंग्रजी बोलणा-या या पोलीस महिला विदेशी पर्यटकांच्या सहाय्यासाठी आम्हाला उपयोगी होतील आणि या पोलिसांच्या परिचयातून हजारो गुजराती पर्यटक ईशान्य भारतात येतील असे सांगतानाच या सगळ्या पोलिसांचा सगळा खर्च आपण करू असेही मोदी यावेळी म्हणाले.

Story img Loader