प्रचारसभेसाठी ऐनवेळी मागितलेली परवानगी निवडणूक आयोगाने नाकारल्याने बिथरलेल्या भाजपने गुरुवारी नवी दिल्ली आणि वाराणसीत तीव्र निदर्शने करून निवडणूक आयोगाला ‘लक्ष्य’ केले. तर तणावाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दिलेले प्रतिबंधात्मक आदेश धुडकावून मोदींनी वाराणसीत ‘रोड शो’ केला.
निवडणूक आयोगाने राजकीय दबावाखाली आपल्याला गंगा आरती आणि प्रचार सभा घेण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप करत नरेंद्र मोदींनी गुरुवारी आयोगावर टीकास्त्र सोडले. ट्विटरपासून जाहीर सभांपर्यंत दिवसभर मोदींच्या निशाण्यावर निवडणूक आयोगच होता. ‘हा माझ्या लोकशाही हक्कांवर घाला आहे. इतर सर्व उमेदवारांना मिळतो तो अधिकार मलाही मिळायला हवा. मला गंगा मातेचे दर्शन घेण्याचीही परवानगी नाकारण्यात आली,’ असे मोदी दिवसभर म्हणत होते. दुसरीकडे अरुण जेटली आणि अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांनी आयोगावर हल्लाबोल चढवला. या नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयासमोर तसेच नवी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. मोदींच्या सभेला परवानगी नाकारणारे वाराणसीतील निवडणूक अधिकारी प्रांजल यादव हे पक्षपाती असल्याचा आरोप करत त्यांना हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वाराणसीतील निदर्शनांदरम्यान भाजप कार्यकर्त्यांची आप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत झटापटीही झाली. या तणावाच्या पाश्र्वभूमीवर वाराणसीचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी एम. सी. सिंग यांनी शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. मात्र, गुरुवारी दुपारी वाराणसीत पोहोचलेल्या मोदी यांनी हे आदेश धुडकावून ‘रोड शो’ केला. बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या आवारात हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर मोदींनी सिगरा येथील भाजपच्या मुख्य निवडणूक कार्यालयापर्यंतच्या पाच किमीच्या अंतरावर मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांसमवेत चर्चाही केली.
भाजपचा हट्टाग्रह
नरेंद्र मोदींच्या सभेसाठी भाजपने ऐनवेळी परवानगी मागितली. ज्या बेनियबाग येथे सभेसाठी परवानगी मागण्यात आली होती, तो भाग संवेदनशील असल्याने निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली. त्यानंतर भाजपने पर्यायी जागेसाठीची परवानगीही मिळवली. मात्र, अचानकपणे घुमजाव करत पक्षाने आधीच्याच जागेवर सभा घेण्यासाठी आग्रह धरला व निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.
उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेल्या तीन टप्प्यांपासून निवडणूक आयोग पक्षपात करत आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. ते कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत, हे मला माहित नाही. पण हा माझ्या लोकशाही हक्कांवर घाला आहे. – नरेंद्र मोदी</strong>