गेल्या ४१ दिवसांपासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध चालू आहे. या युद्धावर जागतिक नेते लक्ष ठेवून आहेत. हे नेते सातत्याने युद्धावर आणि युद्धाच्या परिणामांवर बोलत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंदेखील या युद्धावर लक्ष आहे. दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ समिटच्या उद्घटनाच्या सत्रातही नरेंद्र मोदी यांनी या युद्धावर भाष्य केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी हिंसा आणि दहशतवादाविरोधात भारताच्या कठोर भूमिका मांडल्या. तसेच इस्रायल-हमास युद्धामुळे पश्चिम आशियात वाढलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व देशांमध्ये एकता आणि सहकार्य असण्याची आवश्यकता असल्याचं मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं. तसेच ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण सगळेजण पाहत आहोत की, पश्चिम आशियातल्या घटनांमुळे नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा भारताने निषेध नोंदवला आहे. तसेच भारताने संयम बाळगला आहे. आम्ही सध्या संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर दिला आहे. या युद्धात सामान्य जनता भरडली जात आहे. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी बातचीत केल्यानंतर आम्ही पॅलेस्टाईनमधील नागरिकांसाठी मानवतावादी मदत पाठवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ग्लोबल साऊथमधल्या देशांनी आता मोठ्या जागतिक हितांसाठी एकत्र यायला हवं. जगाच्या भल्यासाठी आपण एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे.” ग्लोबल साऊथ देशांचा एक समूह आहे. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडातील देशांचा यात समावेश आहे.
इस्रायल दक्षिण गाझामध्ये लष्करी कारवाईचा विस्तार करणार
दुसऱ्या बाजूला गेल्या ४२ दिवसांपासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध चालू आहे. हमासचा समूळ नायनाट करण्यासाठी इस्रायलने आता गाझा पट्टीत जमिनी कारवाई सुरू केली आहे. इस्रायली सैन्याने दक्षिण गाझामध्ये पत्रके टाकून पॅलेस्टिनी नागरिकांना तो भाग सोडून जाण्यास सांगितलं आहे. त्यामुळे इस्रायल आता दक्षिण गाझामध्ये लष्करी कारवाईचा विस्तार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा >> “डीपफेकमुळे समाजात अराजकता निर्माण होईल”, पंतप्रधानांचं विधान; गरबा व्हिडीओप्रकरणीही केलं भाष्य!
इस्रायलच्या फौजांनी उत्तर गाझामधील अल-शिफा या सर्वात मोठ्या रुग्णालयात शोध मोहीम गुरुवारीदेखील सुरू ठेवली. या रुग्णालयात काही बंदुका सापडल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. मात्र, रुग्णालयाच्या खाली हमासचा तळ असल्याचा त्यांचा दावा सिद्ध करणारे कोणतेही पुरावे त्यांनी अद्याप दिलेले नाहीत. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनीदेखील इस्रायलचे हे आरोप फेटाळले आहेत.