‘चांगले दिवस येणार..’ म्हणत भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या तयारीत असलेल्या नरेंद्र मोदींना सध्या सोशल नेटवर्कींग साईटवरही चांगले दिवस आले आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय नेते अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापाठोपाठ नरेंद्र मोदींना फेसबुक पेजवर सर्वाधिक लाईक्स आहेत. विशेष म्हणजे ही आकडेवारी फेसबुकनेच अधिकृतरित्या प्रसिध्द केली आहे.
मोदींचे फेसबुकवरील पेज हे सर्वांत जलद लाईक्स मिळवणारे पेज ठरले आहे. कोणत्याही इतर राजकीय नेत्यापेक्षा किंवा निवडणुकीच्या बातम्या देणा-या संकेतस्थळांच्या तुलनेत मोदींच्या पेजला सर्वाधिक पसंती मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ७ एप्रिलला पार पडला त्यावेळी मोदींच्या फेसबुक पेजला १२.४६ दशलक्ष लाईक्स होते. मंगळवारी राष्ट्रापती प्रणब मुखर्जी यांच्यातर्फे त्यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर हा आकडा १५.२४५ दशलक्ष वर गेला आहे.
अमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना फेसबुकवर ४० दशलक्ष लाईक्स असून त्यांच्यापाठोपाठ आता मोदींनी क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे फेसबुकवरील मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख हा ओबामांपेक्षाही चढता आहे. यामध्ये मोदींच्या फेसबुकवरील लोकप्रियतेत १.१७१% आणि ओबामा यांच्या लोकप्रियतेत 0.305% टक्क्याने वाढ होत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रियतेच्या बाबतील आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हेदेखिल पाचव्या क्रमांकावर आहेत.