गेल्या साडेनऊ वर्षांपासून महाराष्ट्र व केंद्रातील सत्तेत काँग्रेसच्या हातावर घट्ट बसलेल्या ‘घडय़ाळा’चे काटे आता  ‘कमळा’च्या दिशेने फिरू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर बदलणाऱ्या संभाव्य समीकरणांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यात १७ जानेवारीला दिल्लीत चर्चा झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूपीएच्या विजयाची शाश्वती नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मोर्चा भाजपच्या गोटाकडे वळवल्याचे संकेत या भेटीने दिले आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर केलेली टीका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळल्यापाठोपाठ आलेल्या या भेटीच्या वृत्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या वाटचालीची दिशाच जणू दाखवून दिली आहे.
सुमारे अर्धा तास चाललेल्या या चर्चेचा सुगावा राष्ट्रवादीच नव्हे तर भाजपच्या नेत्यांनाही लागला नाही. या भेटीचा संपूर्ण तपशील समजू शकला नसला तरी त्यात निवडणुकीनंतरच्या जुळवाजुळवीवर चर्चा झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससमवेत युती करण्यावर पवार ठाम आहेत. मात्र निवडणुकीनंतर केंद्रातील समीकरणे बदलल्यास पवारांची भूमिका बदलू शकते, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
पवारांच्या या ‘मोदीकार्डा’मागे काँग्रेसकडून होत असलेला राहुल यांचा ‘जयघोष’ कारणीभूत असल्याचे समजते. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची पवार यांची तयारी नाही. तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. त्यातच मोदी लाटेमुळे काँग्रेसच्या विजयाबाबत पवार साशंक आहेत. हेच प्रमुख कारण मोदी-पवार यांच्या भेटीमागे असल्याचे समजते.

महाराष्ट्रातून मात्र विरोध, राजू शेट्टीही नाराज
भाजपचे केंद्रीय नेतृत्व पवार यांच्याशी हातमिळवणी करण्यास अनुकूल असले तरी ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीचा महायुतीत समावेश करण्यास तीव्र विरोध आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यास महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप नेत्यांना इचलकरंजी येथे गुरुवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत दिला आहे.  

Story img Loader