आज लोकसभेचे नेते म्हणून, भाजपाचे नेते म्हणून आणि एनडीचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांच्यासह सगळ्याच घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर मोदी यांनी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर कडाडून टीका केली. मला वाटलं होतं की ४ जूनचे निकाल सुरु झाले तेव्हा ईव्हीएमची प्रेतयात्रा विरोधक काढतील. पण तसं काहीही झालेलं नाही असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला. तसंच आमच्या विरोधात जे खासदार निवडून आलेत मी त्यांचंही अभिनंदन करतो असंही आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत नरेंद्र मोदी?
ज्यांनी ज्यांनी आपली सत्ता येण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. एनडीएच्या नेते पदी माझी निवड करुन तुम्ही सगळ्यांनी मला नवी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मी तुमचा खूप खूप आभारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. २०१९ मध्ये मी जेव्हा याच सदनात मी बोलत होतो तेव्हा मी म्हटलं होतं विश्वास. आज पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी माझी निवड केली आहे याचा अर्थ आहे की माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला आहे.
हे पण वाचा- नरेंद्र मोदींचं वक्तव्य “एनडीए इतकं यश कुणालाच मिळालेलं नाही, सरकार चालवण्यासाठी बहुमत हवं, पण…”
मला तर वाटलं होतं की ईव्हीएमची प्रेतयात्रा निघणार
४ जूनचे निकाल लागत असताना मी माझ्या काही कामांमध्ये व्यग्र होतो. मला नंतर फोन येऊ लागले. मी त्यानंतर कुणाला तरी म्हटलं की ठीक आहे हे सगळं पण मला एक सांगा ईव्हीएम जिवंत आहे की मेलंय? या लोकांनी ठरवून टाकलं होतं की लोकशाहीवरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे. यावेळी तर ईव्हीएमची प्रेतयात्रा निघेल असं वाटलं होतं. पण त्या ईव्हीएमनेच विरोधकांची तोंडं बंद केली. निवडणूक आयोग, लोकशाहीची ताकद त्यादिवशी सगळ्यांनाच कळली.
निवडणूक आयोगावरच हल्ला करण्याचं विरोधकांनी ठरवलं होतं
निवडणूक सुरु असताना निवडणूक आयोगाला कोर्टात जावं लागलं. निवडणूक आयोगावरच विरोधकांनी हल्लाच करायचं ठरवलं होतं. ते एक षडयंत्र होतं. या लोकांना कधीही देश माफ करणार नाही. इंडिया आघाडीचे नेते ईव्हीएमचा विरोध करतात तेव्हा त्याला मी फक्त विरोध म्हणून बघत नाही. टेक्नॉलॉजी यांना कळतच नाही. त्यांना सगळ्या चांगल्या टेक्नॉलॉजी असलेल्या गोष्टींमध्ये यांना काहीही चांगलं दिसलं नाही. यांनी आधार कार्डाचाही विरोध केला. इंडिया आघाडीने चांगल्या आणि आधुनिक गोष्टींचा विरोधच दर्शवला आहे ही बाब खरंच चिंताजनक आहे.
निकालानंतरचे दोन दिवस एनडीएचा पराभव झाल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं
मी जगात हे सांगतो आहे आमचा देश लोकशाहीची जननी आहे. मात्र इंडिया आघाडीचे लोक मात्र मोदी तिथे बसलाय म्हणून विविध भ्रम पसरवत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. ४ जूनला मतमोजणी होती. त्यात योजनाबद्ध पद्धतीने देशात हिंसा घडावी असे मनसुबे विरोधकांनी आखल्याचं पाहण्यास मिळालं. निकाल येण्याआधी असा कट आखला गेल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला. जे निकाल आत्ता लागले आहेत ते जगाने पाहिले तर लक्षात येतं की हा एनडीएचा महाविजय आहे. दोन दिवस एनडीचा पराभव झाला आहे असंही चित्र निर्माण केलं. मात्र अशा काल्पनिक गोष्टी त्यांना कराव्या लागत आहेत. सर्वात मजबूत युतीचं सरकार म्हणजेच आपलं आत्ताचं एनडीए सरकार आहे. पण विरोधकांनी चित्र हे उभं केलं की एनडीएचा पराभवच झाला. आपण हरलेलो नाही, हरणार नाही. ४ जूननंतर आपण शांत होतो कारण आपल्याला यश पचवण्याचे संस्कार आहेत. आपल्यावर संस्कार आहेत. तुम्ही कुणालाही विचारा अगदी लहान मुलगाही तुम्हाला सांगेल २०१९ मध्ये एनडीएचं सरकार होतं आणि २०२४ मध्येही एनडीचं सरकार असेल.
१० वर्षांनीही काँग्रेसला १०० चा आकडा गाठता आला नाही. मी जर २०१४ , २०१९ आणि २०२४ या तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या तितक्या आपल्याला एका निवडणुकीत मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीला हा अंदाज नाही की येत्या काळात ते किती गाळात जाणार आहेत. असाही टोला नरेंद्र मोदींना लगावला आहे.